मृत बिबट्याचा शोध लावण्यास वनविभागाला अपयश

HomeNewsनागपुर डिवीजन

मृत बिबट्याचा शोध लावण्यास वनविभागाला अपयश

सारखणी बिटातील जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना निलंबित करावे

विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे ०९ डिसेंबर पासून आमरण उपोषण

गौतम नगरी चौफेर (नांदेड: (संजीव भांबोरे) – किनवटच्या सहाय्यक वनसंरक्षकांच्या कार्यकक्षेतील मांडवी वनपरिक्षेत्राच्या सारखणी घाटात २७ ऑक्टोबर रोजीच्या रात्री बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करुन प्रकरण रफादफा करण्याच्या हेतुने मृत बिबट्या गायब केल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. एक महिन्याच्या वर दिवस लोटले तरीही नांदेडचे उपवनसंरक्षक, किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक आणि मांडवीचे वनक्षेत्रपाल यांनी मृत बिबट्या विषयी जीवंत असल्याचा अथवा मृत्त झाल्याचा खुलासा करण्याचे धाडस दाखवले नसल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होतांना दिसत आहे. नांदेड वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी यांनी मृत बिबट्या जंगलात पळून गेल्याचा जावई शोध लावला होता. तोही फोल ठरला आहे. येत्या काही दिवसांत वनविभागाने खुलासा न केल्यास वनप्रेमी वन्यजीवप्रेमी रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  मांडवी वनविभागाचे वनक्षेत्रपालांची कारकीर्द ही भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचा अनेकांचा आरोप आहे. आणि ह्या अगोदर एका अधिकाऱ्यास निलंबित सुद्धा करण्यात आले आहे. खैर लाकडाची अवैध वृक्ष तोड होत असतांनाही त्यांच्या अखत्यारीतील संबंधित कर्मचाऱ्यांनी रोखवण्याचा प्रयत्न केला नाही. सागवान वृक्षांचीही तोड होत असतांनाही वनक्षेत्रपालांनी कसलीही कारवाई केलेली नाही. याचाच अर्थ वनाधिकाऱ्यांची मुकसंमती असेल का? यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत असे ऐकायला मिळत आहे. बीटनिहाय तपासणी केल्याशिवाय सत्यता समोर येणार नाही. त्यातच अधिकची भर म्हणून वन्यप्राणी देखिल त्यांनी सुरक्षित ठेवले नाहीत ना देखभालही केलेली दिसत नाही. २७ ऑक्टोंबर रोजी सारखणी घाटातील बिबट्या प्रकरण पुरावा म्हणून पुरेसे ठरेल. त्यांच्या अक्षम्य लापरावाह कार्यप्रणालीचा बिबट्या भरधाव अज्ञात वाहनांचा शिकार ठरला. २७ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या आसपास सारखणी घाटात मांडवी वनविभागाच्या सरहद्दीजवळ अज्ञात वाहनाची बिबट्याला जोरदार धडक बसल्याने जागीच अतीरक्तस्त्राव होऊन तो जागीच मृत्त झाल्याची प्रत्यक्ष दर्शीतांनी वनविभागाला माहिती दिली. सारखणीसह अन्य गावातून आणि राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बिबट्याला जवळून पाहिल्यानंतर त्याची जराही हालचाल होत नसल्यामुळे मृत्त झाल्याचा लोकांनी अनुमान लावला. वेळेवर वनकर्मचारी पोहोचले नसल्याने बिबट्याच्या मृत्यूस त्यांची दिरंगाई भोवल्याचाही त्यांच्यावर उपस्थितांनी आरोप लावला आहे. बघ्यांची गर्दी असेपर्यंत बिबट्या जागेवर होता. पण कर्मचारी आले नव्हते. लोकांची गर्दी ओसरल्यानंतर मृत्त बिबट्या गायब केला. तदोपरांत वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापुर्वीच बिबट्या गायब केल्याचे वनपालांनी सांगितले. मृत्त बिबट्या गायब प्रकरणानंतर छत्रपती संभाजीनगरचे मुख्यवनसंरक्षक, नांदेडचे उपवनसंरक्षक आणि किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक दुसऱ्या दिवसी घटनास्थळी पोहोचले. फक्त रक्ताचा पडलेला सडा पहाण्याशिवाय त्यांना कांहीच सापडले नाही. पशु वैद्यकीय विभागाने रक्ताचे नमुने घेऊन प्रयोग शाळेला पाठवलेत त्याचा अहवालही अद्याप लपऊन ठेवलेला आहे. प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी वनविभागाने बिबट्या जंगलातच आश्रयासाठी गेला असून वनविभाग शोध घेत असल्याचा जावाई शोध पुढे करुन लोकांची आणि वरिष्ठांनी दिशाभूल करण्याचा शुद्ध प्रयत्न केला. ०८ डिसेंबर पर्यंतही वनविभागाला बिबट्यावाघ सापडला नाही. कसा सापडेल पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने गायब केलाय. वनविभागाला बिबट्या प्रकरणाविषयी बोलके व्हावेच लागणार आहे. तुर्तास वनरक्षक, वनपाल आणि वनक्षेत्रपालास जबाबदार धरुन निलंबन करावे. या मागणीसाठी शंकर सिंह ठाकुर व मारुती शिकारे हे विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे. उच्च स्तरीय चौकशीची मागणी करणाऱ्या तक्रारींची संख्या वाढतच आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्तविली आहे. यातून काय समोर येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

COMMENTS