आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश; २.३२ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता शेतकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सुटणार!
गौतम नगरी चौफेर कोरपना, दि. ०३ तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीसरात भव्य ‘शेतकरी भवन’ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने या शेतकरी भवनाच्या बांधकामासाठी २ कोटी ३२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ योजना
राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना राहण्याची व जेवणाची सोय व्हावी, या उद्देशाने ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ योजना राबविली जाते. कोरपना येथे अशा सुसज्ज भवनाची कमतरता असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार देवराव भोंगळे यांनी शासनाकडे या निधीसाठी विशेष आग्रह धरला होता.
आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत :
शासनाने ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार, या नवीन शेतकरी भवनात शेतकऱ्यांसाठी मुक्कामाची सोय, मूलभूत सोयी-सुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उपसंचालक (पणन), पुणे यांनी या प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल सादर केला होता, ज्याला आता अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
शेतकऱ्यांचे हित हेच आमचे प्राधान्य : आमदार देवराव भोंगळे
कोरपना तालुका हा शेतीबहुल तालुका असून या भागातील शेतकऱ्यांचे हित हेच आमचे प्राधान्य आहे. बाजार समितीत येणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांना हक्काची जागा मिळावी आणि त्यांची राहण्याची गैरसोय टळावी, यासाठी या भवनाचा पाठपुरावा केला होता. लवकरच या कामाचे भूमिपूजन होऊन हे शेतकरी भवन सेवेत दाखल होईल. या निर्णयामुळे कोरपना तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, बाजार समितीच्या विकासालाही यामुळे गती मिळणार आहे असा विश्वास आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला.


COMMENTS