गौतम नगरी चौफेर – शिला धोटे चंद्रपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष कामाचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, या विकासकामाबाबत समाजात भ्रम पसरवण्याचे प्रयत्न सुरू असून हा वाद पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे सर्वांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
आमदार जोरगेवार म्हणाले की, या वादाचा दीक्षाभूमीच्या विकासावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी घोटेकर आणि खोब्रागडे या दोन्ही गटांशी स्वतः भेटून चर्चा करणार असून सर्व गैरसमज दूर केले जातील. तसेच समाजबांधवांनी विकासासाठी विधायक सूचना कराव्यात, असे आवाहन आ. जोरगेवार यांनी केले. १६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरच्या ऐतिहासिक भूमीत लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली होती. नागपूर दीक्षाभूमीच्या धर्तीवर चंद्रपूर दीक्षाभूमीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेरीस राज्य शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५६ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यामुळे आता सामाजिक

व सांस्कृतिक प्रबोधनासोबतच चंद्रपूरचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रसंगी दीक्षाभूमीच्या प्रस्तावित विकासकामांचे आर्किटेक्चरल सादरीकरण करण्यात आले. मूळ ऐतिहासिक दीक्षाभूमी मैदानाच्या स्वरूपाला कोणताही धक्का न लावता हे सुशोभीकरण केले जाणार आहे. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला जाणार असून, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनासाठी अत्याधुनिक सुविधा आणि पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती आ. जोरगेवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला नगरसेविका शितल गुरनुले, माजी नगरसेवक डोडानी, नगरसेवक चंद्रशेखर शेट्टी, रवी गुरनुले आणि प्रकाश देवतळे उपस्थित होते.

