सात ते आठ महिन्यांचे मानधन थकीत.

HomeNewsनागपुर डिवीजन

सात ते आठ महिन्यांचे मानधन थकीत.

वनविभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ५ नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलनाचा इशारा!
गौतम नगरी चौफेर बांदल बेले राजुरा,
दि.२ नोव्हेंबर राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी संगणक चालक, रोपवण मजूर व हंगामी चौकीदार यांचे मागील सात ते आठ महिन्यांपासूनचे मानधन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर आला असतानाही मानधन मिळत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी वनविभाग प्रशासनाकडे निवेदन सादर करून दिवाळीपूर्वी संपूर्ण थकीत मानधन अदा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ५ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य चांदा वन विभागाचे राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत कार्यरत कंत्राटी संगणक चालक, रोपवण मजूर व हंगामी चौकीदार हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. वनविभागाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजासह रोपवण व इतर वनविषयक कामांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी हे कर्मचारी विशेष कार्य करीत आहेत मात्र, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांचे मानधन अदा करण्यात आलेले नसल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मानधनाअभावी कर्मचाऱ्यांना घर खर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, कर्जाचे हप्ते तसेच इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिकारी व इतर कर्मचारी दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्याच्या तयारीत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र थकीत मानधनाअभावी सणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दुकानदार उधारी देईना आणि वनाधिकारी वेतन देईना अशी अवस्था झाली. विशेष म्हणजे अशा विवंचनेत दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणींची दखल घेऊन त्यांचे हक्काचे मजुरी वेळेत अदा करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत संपूर्ण थकीत वेतन अदा करण्याची मागणी केली आहे. निर्धारित मुदतीत वेतन न मिळाल्यास ५ नोव्हेंबरपासून राजुरा वनपरिक्षेत्रातील सर्व कंत्राटी संगणक चालक व रोपवण मजूर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. प्रलंबित मानधन पूर्णपणे अदा होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आता वनविभाग प्रशासन या गंभीर प्रश्नाची कितपत दखल घेते आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत मानधन जमा होते का, याकडे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

    You cannot copy content of this page