हिरापूर गावात भीषण पाणीटंचाई – शेतातील बोअरवेल बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

HomeNewsनागपुर डिवीजन

हिरापूर गावात भीषण पाणीटंचाई – शेतातील बोअरवेल बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा सुरू; गावातील बोअरवेल व विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,
ता. प्र. राजुरा तालुक्यातील हिरापूर गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावालगतच्या शेतांमध्ये शेतकऱ्यांकडून बोअरवेलद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू असल्याने गावातील बोअरवेल व विहिरी कोरड्या पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शेतीतील बोअरवेल तातडीने बंद करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक व महिलांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गावातील शेतजमिनींमध्ये बोअरवेल व मोटारपंपाच्या साहाय्याने शेतीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. परिणामी गावातील हातपंप, बोअरवेल व विहिरींची पाणीपातळी खालावली असून नागरिकांना पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. गावालगतच्या शेतांतील बोअरवेल बंद केल्यास भूजलपातळीत वाढ होऊन गावातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या उन्हाळा सुरू होण्यास अद्याप अवधी असतानाच पाण्याचे संकट गंभीर बनले आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गावालगतच्या शेतांतील बोअरवेल व मोटारपंपाद्वारे होणारा पाणीउपसा बंद करावा. आवश्यकता भासल्यास संबंधित शेतांतील वीजपुरवठा खंडित करून गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यासंदर्भात २७ ऑक्टोबर रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी राजुरा यांना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी शंकर मालवे, विनोद शेरकुरे, अरविंद देवगडे, जंगलु मालवे, सुरेश सॅम्पलवार, सिंधू घटे, कमला कोडापे, विद्या देवगडे, अरूणा पवार, आशा मडचापे, मंगला मालवे, तनुश्री पवार, लता शेरकुरे, तेजल कोडापे यांच्यासह मोठ्या संख्येने हिरापूर येथील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

    You cannot copy content of this page