– वनविभाग परिक्षेत्र राजुरा अंतर्गत नियतक्षेत्र कक्ष क्रमांक १७१ व १७६ मध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवला पक्षांचा मुक्त संचार.
गौतम नगरी चौफेर (सुवर्णा बादल बेले राजुरा) – २३ जानेवारी
वनपरिक्षेत्र राजुरा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरीता पक्षी निरीक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंगेश गिरडकर, उपविभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनात गजानन इंगळे, वन परिक्षेत्र अधिकारी राजुरा यांच्या नेतृत्वात सदर पक्षी निरीक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शक म्हणून वनविभागाचे परिवेक्षाधीन वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश शिवराज पाटील, एस. जी. गरमडे, क्षेत्र सहाय्यक, राजुरा, पी. ए. मंदुलवार, नियत वनरक्षक राजुरा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना विभागाचे विद्यार्थी या पक्षी निरीक्षणात सहभागी झाले होते. जोगापूर वनपर्यटन क्षेत्र, नियतक्षेत्र जोगापूर कक्ष क्रमांक १७१, नियतक्षेत्र शिरसी कक्ष क्रमांक १७६ येथे सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत हा पक्षी निरीक्षण व मार्गदर्शनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. मार्गदर्शकांनी जोगापूर तलावाच्या परिसरात आढळणारे पक्षी, प्राणी, साप, वृक्ष यांच्याबद्दल माहिती दिली. दुर्बीण च्या सहाय्याने प्रत्यक्ष पक्षी निरीक्षणात विद्यार्थी रमून गेले होते. पौंड हेरॉन , टिटवी , हरियाल , बगडा , कवडी, पोपट व विविध पक्षांचे निरीक्षण व माहिती घेण्यात आली. पाण्यात, जमिनीवर आणि आकाशात उंच उडणारे पक्षी असे विविध प्रजातीच्या पक्षांची माहिती देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, वर्गशिक्षिका वैशाली चिमुरकर , निखिल खोब्रागडे, वनमजूर आदींची उपस्थिती होती. वनपरिक्षेत्र कार्यालय राजुरा मार्फत पक्षी निरीक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव, पर्यावरण संवर्धन व निसर्गाप्रती आपुलकी निर्माण होईल.




COMMENTS