मुख्याध्यापक संघाचे काळ्या फिती लावून शासनाविरोधात निषेध आंदोलन.

HomeNewsनागपुर डिवीजन

मुख्याध्यापक संघाचे काळ्या फिती लावून शासनाविरोधात निषेध आंदोलन.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२४ जुलै: महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाच्या वतीने आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांवरील कथित अन्यायकारक निलंबन कारवाईच्या निषेधार्थ गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी राज्यभर काळ्या फिती लावून एकदिवसीय निषेध आंदोलन करण्यात आले.
संघाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आदिवासी विकास विभागांतर्गत महाराष्ट्रातील विविध आश्रमशाळांमध्ये कार्यरत मुख्याध्यापक, अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर कोणतीही सखोल चौकशी न करता निलंबनाची कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाने अशा निर्णयांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी संघाने केली आहे.
संघाचे राज्याध्यक्ष वामनराव शिरणे यांनी सांगितले की, आश्रमशाळांमध्ये निधीअभावी अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. विविध प्रशासकीय अडचणी, मनुष्यबळाची कमतरता आणि आर्थिक मर्यादा असतानाही मुख्याध्यापकांवर एकतर्फी कारवाई केली जात आहे. दोषी आढळल्यास योग्य चौकशी करूनच कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
संघाचे राज्यसचिव अनिल कांबळे यांनी सांगितले की, मुख्याध्यापक, अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात हे आंदोलन करण्यात आले असून, शासनाने निलंबनाचे आदेश मागे घेऊन संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात राज्यातील नाशिक, किनवट, धुळे, नंदुरबार आदी विभागांतील आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाने दिला आहे.

You cannot copy content of this page