गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, ता.24 सप्टेंबर 2025 : स्मार्ट ग्राम मंगी (बु.) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी मा.विकास राचेलवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आदी कर्मयोगी अभियानांतर्गत शिवार फेरी, गाव विकास आराखडा तसेच आदी सेवा केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात गाव विकास आराखड्याद्वारे गावाच्या शाश्वत विकासाला गती मिळणार असून शिवार फेरीमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतपातळीवरील नियोजन, जलसंधारण, मृदासंवर्धन तसेच उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी थेट मार्गदर्शन मिळणार आहे. आदी सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजना, सेवा व उपक्रम एका छताखाली सुलभपणे उपलब्ध होणार आहेत.
प्रकल्प अधिकारी मा.विकास राचेलवार साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “स्मार्ट ग्राम संकल्पना ही केवळ सुविधा उपलब्ध करून देण्यापुरती नसून गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचा सामूहिक प्रयत्न आहे. यामधून शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे हा मुख्य उद्देश आहे.”
या प्रसंगी गावातील सरपंच शंकर तोडासे, उपसरपंच वासुदेव चापले, ग्रामविकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, अनिरुद्ध शेंडे विस्तार अधिकारी पंचायत, अमोल नवलकर आदिवासी विकास निरीक्षक, ग्रामपंचायत अधिकारी नंदिनी कोरवते, शाळेचे मुख्याध्यापक मारोती चापले, विशाल दवंडे गृहपाल, खिल्लारे कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विकास आराखड्याची माहिती सादर करण्यात आली.
स्मार्ट ग्राम मंगी (बु.) येथे झालेले हे उद्घाटन ग्रामविकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून गावकऱ्यांमध्ये नवी उर्जा व विकासाची प्रेरणा निर्माण झाली आहे.


COMMENTS