गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :– राजुरा तालुक्यातील वर्धा नदी परिसरात धानोरा, आर्वी, विरूर स्टेशनसह विविध भागांत अवैध रेती उत्खनन व तस्करीचा महापूर उसळलेला असून शासनाला कोट्यवधींचा महसुली तोटा सहन करावा लागत आहे. नियम, अटी-शर्ती आणि परवाना प्रक्रियेची पायमल्ली करत, काही लोकप्रतिनिधींच्या छुप्या आशीर्वादाने रेती माफिया क्रेन, शेकडो ट्रॅक्टर, टिपर व डंपरच्या मदतीने दिवसाढवळ्या रेती उपसा करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने माफियांना चक्क मोकळा रस्ता मिळाल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या अंधारात सुरू होणारी ही वाहतूक केवळ नदीपात्रालाच नाही तर आजूबाजूच्या रस्त्यांनाही पोखरत आहे. भेंडाळा – विरूर स्टेशन – अमृतगुडा या मार्गावर प्रचंड खड्ड्यांमुळे खासगी तसेच शासकीय वाहनांची वाहतूक ठप्प झाली असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. नागरिक व विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यास बाध्य झाले आहेत.

पुरातत्त्व व पर्यावरणीय नियमांनुसार, महत्त्वाच्या ठिकाणांच्या ३०० मीटर परिसरात कोणतेही उत्खनन निषिद्ध आहे. मात्र या नियमालाही पायदळी तुडवत रेती माफिया नदीवरील पूल, पक्के रस्ते आणि निसर्गाचा उघडपणे ऱ्हास करीत आहेत. प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक समाजघटक व पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
या गंभीर पार्श्वभूमीवर, तालुका काँग्रेस कमिटी राजुरा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून तातडीने अवैध रेती उपसा व वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास जोरदार आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती विकास देवाळकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, सुरेश पावडे, धनराज चिंचोलकर, रामभाऊ धुमणे, मंगेश गुरनुले, प्रणय लांडे, अभिजीत भुते, हेमंत झाडे यासह तालुका काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


COMMENTS