गडचांदूर शहरात मुख्य नाल्याचे काम ठप्प – बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदूर शहरात मुख्य नाल्याचे काम ठप्प – बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान

गौतम नगरी चौफेर //विनोद खंडाळे गडचांदूर (प्रतिनिधी) – गडचांदूर शहरातील महत्त्वाच्या हायवे रोडलगत असलेल्या नगर परिषदेकडील मुख्य नाल्याचे काम मार्च महिन्यापासून पूर्णतः ठप्प आहे. या संदर्भात अनेक व्यापारी व स्थानिक नागरिकांनी नगर परिषद गडचांदूरला वेळोवेळी लेखी निवेदने दिली असूनही, बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कृती झालेली नाही. परिणामी संपूर्ण शहरात नाराजीचा सूर चढला असून, प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

या ठिकाणी हायवे रोडच्या दोन्ही बाजूंना व्यापारी दुकाने असून, नालीचे अर्धवट राहिलेले बांधकाम यांच्यासमोर मोठा अडथळा ठरत आहे. नालीचे काम थांबवून महिनोन्महिने झाले, त्यामुळे या ठिकाणी चिखल, घाण पाणी व दुर्गंधी यांचे साम्राज्य पसरले आहे. ग्राहकांनी या परिसराकडे पाठ फिरवली असून, दुकानदारांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.

“दुकानासमोर रस्ताच नाही, मग ग्राहक येणार कसे?” – असा थेट सवाल आता येथील व्यापारी विचारू लागले आहेत. काहींनी तर आपल्या दुकानांमध्ये दिवसांमध्ये एकही ग्राहक न आल्याचे सांगत हे सर्व बांधकाम विभागाच्या निष्काळजी वृत्तीचे परिणाम असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक व्यापारी अडचणीत आले असून काहींवर उपासमारीची वेळ आली आहे.

नागरिक आणि व्यावसायिकांनी मार्च महिन्यापासून अनेक वेळा तक्रारी दिल्या, निवेदने सादर केली, तरीही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे हे प्रकरण नगर परिषदेकडील प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षाचे उदाहरण ठरत आहे. प्रशासनाने केवळ आश्वासनांच्या पोकळ गप्पा मारत वेळ मारून नेली आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे.

“बांधकाम विभागाला वारंवार सूचना करूनही नालीचे काम सुरू करत नाहीत. त्यामुळे संपूर्ण शहर आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. या गोंधळासाठी जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर चौकशी व्हावी,” अशी मागणी आता व्यापारी संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी एकत्रितपणे केली आहे.

या ठिकाणी नालीच्या अर्धवट बांधकामामुळे रस्त्याचा उपयोग होऊ शकत नसल्याने अपघातांचीही शक्यता वाढली आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि पादचारी यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा जवळ आला असताना, जर हे नाले बंद राहिले, तर संपूर्ण परिसरात पाणी साचून मोठा आरोग्यसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

तरी संबंधित बांधकाम अधिकारी, नगर परिषद प्रशासन व मुख्याधिकारी यांनी यावर तातडीने लक्ष घालून मुख्य नाल्याचे काम पूर्णत्वास न्यावे, ही व्यापारी वर्ग व जनसामान्यांची एकमुखी मागणी आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

COMMENTS