गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
नागपूर – दिल्लीतील संसद परिसरात आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवताना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आक्रमक खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे केंद्र सरकारविरोधात ठामपणे उभे राहिले.
सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी नाही, फसवण्यासाठी काम करतेय. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांची वेदना माझ्या रक्तात आहे. मी शांत बसणार नाही! असे संतप्त उद्गार त्यांनी आंदोलनावेळी दिले. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेतील जे. पी. नड्डा यांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला आणि जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना खत द्या, खते द्या – नाहीतर सत्ता सोडा, शेतकरी जगला तरच देश जगेल अशा घोषणा परिसरात घुमल्या.
खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी सांगितले की महाराष्ट्रात यावर्षी 48.50 लाख मेट्रिक टन खताची गरज असूनही आतापर्यंत केवळ 28.25 लाख टन खताचा पुरवठा झाला आहे. उरलेल्या 19.98 लाख टन खताच्या टंचाईने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. खते वेळेवर न मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आहे. करिता केंद्र सरकारच हेच जबाबदार आहे. आणि मी हे गप्प राहून बघणार नाही, असे सांगत खासदार पडोळे यांनी सरकारवर हल्ला चढवला.
नुकसान भरपाई, सातबारा कोरा, कर्जमाफी, हमीभाव, आणि खत वितरण या सगळ्याच मुद्द्यांवर त्यांनी सरकारची पोलखोल केली. त्यांनी पुढे सांगितले की, निवडणुका आल्या की खोट्या घोषणा होतात, पण निवडणुका गेल्यावर शेतकऱ्यांचं दुःख कुणालाही दिसत नाही.” याप्रसंगी सरकारला इशारा देत खासदार डॉक्टर पडोळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना गाजर दाखवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं बंद करा. शेतकरी आमचा धर्म आहे. त्यांच्यासाठी लढणं ही माझी जबाबदारी नाही, तर माझी कर्तव्य आहे.
ते पुढे म्हणाले की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी धान खरेदीचे लक्ष्य हे अपुरे होते, ते वाढवून देण्याचे विनंती करिता पत्र लिहिले विनंती केल्या मात्र त्याचा फलित होताना दिसत नाही. हे सरकार गरीब शेतकऱ्यांचे नाही तर हे उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे सरकार आहे त्यांना गरिबांच्या शेतकऱ्यांच्या दुःखाची काही घेणे देणे नाही. खतांच्या पुरवठा, बोनसची मागणी, कर्जमुक्तीची मागणी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी याबद्दलही केंद्र सरकार हे सकारात्मक नाही. सरकारचे दरवाजे सामान्यांच्या प्रश्नांसाठी बंद आहेत.
भंडारा-गोंदियाच्या शेतकऱ्यांचा आवाज संसदेत घुमला
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आज दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि खताच्या टंचाईमुळे हवालदिल झाले आहेत. या जिल्ह्यातील पिके, जमीन, आणि आयुष्य संकटात आहे.
माझ्या मतदारसंघातील शेतकरी जगण्यासाठी झगडतोय. रणरणत्या उन्हामध्ये शेती करतोय. मला त्या घामाची शपथ आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी मी तयार आहे. असे मत डॉ. पडोळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
आश्वासन मिळाले कृती केव्हा होणार – डॉक्टर पडोळे
खासदारांच्या प्रभावी आंदोलनानंतर
नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर, खतांच्या तातडीतील पूर्ततेचे आश्वासन सरकारने दिले असले, तरी फक्त आश्वासन नाही, कृती हवी, असे आव्हानही त्यांनी सरकारसमोर ठेवले.


COMMENTS