गौतमनगरी चौफेर (विनोद खंडाळे) – कोरपना तालूक्यातील गडचांदूर शहरात रामकृष्ण हॉटेलपासून वीर बाबुराव शेडमाके चौकापर्यंतच्या परिसरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून यामुळे जुन्या नाल्यांचे पाणी थेट नागरिकांच्या बोरिंगमध्ये मिसळत आहे. परिणामी, नागरिकांना अत्यंत दूषित पाणी मिळत असून अनेक ठिकाणी पोटदुखी, जुलाब, उलटी यांसारखे गंभीर आजार उद्भवत आहेत. या समस्येकडे गडचांदूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “शहरात संसर्गजन्य आजार पसरत असताना प्रशासनाने कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही.”
नगरपरिषद आणि आमदारांनी नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी होत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावले उचलून नाल्याचे पाणी बंदिस्त करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रमुख मागण्या:
1. दूषित पाणीपुरवठा तात्काळ थांबवावा.
2. नाल्यांचे पाणी बंदिस्त करण्यासाठी तातडीने काम हाती घ्यावे.
3. आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावे.
4. दोषी प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.
5. आमदारांनी या गंभीर समस्येवर ठोस भूमिका घ्यावी.
गडचांदूर नगरपरिषद जर या समस्येकडे दुर्लक्ष करत राहिली तर संपूर्ण शहरात गंभीर आरोग्यसंकट निर्माण होईल, याची जबाबदारी पूर्णतः प्रशासनावर राहील.




COMMENTS