– निवडणुक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.
– निवडणुकीला सामोरे जातांना उमेदवारांचा अजब प्रचार.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा २८ नोव्हेंबर
राजुरा येथे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची लगबग सुरू झाली. प्रचाराकरिता मोठ्याप्रमाणात नगराध्यक्ष, नगरसेवक पदाकरीता बॅनर लावण्यात आले. परंतु राजुरा शहराला स्वच्छ सुंदर शहर करण्याच्या आणाभाका घेणारे उमेदवारच चक्क मिळेल तिथे प्रचार बॅनर लावून कुठे विद्युत खांबांचा तर कुठे वृक्षांचा आधार घेऊन काय संदेश देऊ इच्छितात हे त्यांनाच माहीत. आणि आश्चर्य म्हणजे निवडून अधिकारी व संपूर्ण यंत्रणा मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. शहराचे सौंदरीकरण वाढविण्याकरिता उभ्या असलेल्या उमेदवारांनी शहराचे विद्रुपीकरण करणे कितपत योग्य आहे असा सवाल सामान्य नागरिकांना उपस्थित केला आहे. प्रचार बॅनर लावण्याची नियमावली तर असेलच परंतु त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असून नियमांची पायमल्ली होत आहे. एखाद्यावेळेस विद्युत पुरवठा संदर्भात काही अडचण आली तर संबंधित विभागाला खांबावर चढून ती अडचण दूर करता आली पाहिजे परंतु इथे नागरिकांच्या समस्या पेक्षा स्वतः नियमांचे उल्लंघन करण्यात या उमेदवारांचे हित दिसत आहे. जवळपास सर्वच पक्षांनी विद्युत खांबांचा व वृक्षांचा आधार घेऊन प्रचार बॅनर लावले आहेत. या विषयावर तात्काळ लक्ष देण्याची मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने केली आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेची बॅनर लावण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असून त्या अर्जात बॅनर लावण्याच्या स्थळाचा व संबंधितांची नाहरकत जोडावी लागते. मग या विद्युत खांबांची व वृक्षांवर बॅनर लावण्याची परवानगी यांना दिली कोणी असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

———————————————
*कोट*
निखिल लांडगे ,मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा
तक्रारी प्राप्त झाल्यास नियमानुसार कार्यवाही करू. कोणालाही निवडुकांच्या आचारसंहिता किंवा दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग करता येणार नाही. अनाधिकृत व चुकीच्या ठिकाणी लावलेले बॅनर तात्काळ काढण्याची कार्यवाही केली जाईल.
———————————————
*कोट*
मिथुन मेश्राम, विद्युत अभियंता राजुरा
विद्युत विभागातर्फे तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र देऊन पोलिस स्टेशन राजुरा यांना सुद्धा कळविण्यात येईल. विद्युत खांबावर बॅनर फ्लेक्स लावणे चुकीचे असून अशी तक्रार आल्यास आम्ही नक्कीच कार्यवाही करू अशी प्रतिक्रिया मिथुन मेश्राम विद्युत अभियंता राजुरा यांनी दिली.
———————————————





COMMENTS