नोंदणी पद्धतीने विवाह करत समाजाला झाले भोजेकर कुटुंब दिशादर्शक

HomeNewsनागपुर डिवीजन

नोंदणी पद्धतीने विवाह करत समाजाला झाले भोजेकर कुटुंब दिशादर्शक

गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) – सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथील भोजेकर कुटुंबानी आपल्या उच्चशिक्षित मुलीचे लग्न लग्नपत्रिका, बॉन्ड- डिजे, हळदीचा कार्यक्रम, आहेरपट्टी, फोटोग्राफी, जेवणावळी या होणाऱ्या उधळपट्टीला फाटा देऊन कोणताही वाजागाजा न करता नोंदणी विवाह पद्धतीने करण्यात आला. गडचांदूर वार्ड नं. ६ येथील तुळशीराम भोजेकर यांची कन्या नंदिनी आणि याच वार्डातील विलास बाचले यांचा मुलगा विकास या दोन्ही कुटुंबांनी विचारविनिमय करून उभयतांच्या संम्मतीने पैशाच्या उधळपट्टीला फाटा देऊन दिनांक २३ जून २०२५ ला चंद्रपूर येथील नोंदणी विवाह कार्यालयात करण्यात आला.

समाजवादी विचारांचे भोजेकर कुटुंब हे पहिले पासूनच समाज कार्यात सतत कार्यरत असून गावातील अडी अडचणीत असलेल्या सर्व सामान्य कुटुंबाला यथाशक्ती सहकार्य करणारे कुटुंब म्हणून सर्वपरिचित आहेत. यांचे वडीलभाऊ कै. कैकाडीजी भोजेकर हे सुद्धा हिरीरीने सामाजिक कार्यात कोणाच्याही अडीअडचणीला धावून जात होते. विशेष म्हणजे तुळशीराम भोजेकर यांनी आपला विवाह सुद्धा विवाह मेळावा आयोजित करून केला होता. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि लग्न समारंभात होणारी वारेमाप पैशाची उधळपट्टी याला आळा घातला पाहिजे आणि हाच खर्च घरगुती जीवनावश्यक वस्तू खरेदी करून भागविता येऊ शकते. असा विचार करून समाजातील लोकांनी अशा पद्धतीने लग्न कार्य करून होणाऱ्या अव्याढव्य खर्चाला आळा घालावा, असा सुज्ञ विचार करण्यात यावा म्हणून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

आजकाल सर्व सामान्य परिवारात आपल्या उपवर- वधूचे लग्न करणे फारच जिकरीचे आणि वारेमाप खर्चाची बाब होऊन बसली आहे. घरात आर्थिक तंगी असली तरी घर वावर शेत जमिनी विकून, गहाण ठेवून लग्न समारंभ करतात आणि नंतर तो खर्चाचा बोजा वाढत जाऊन जीवनाची भाकरी सुद्धा विकून टाकावी लागते. खर्च करण्याची ऐपत असतांनाही उधळपट्टीला आळा घालण्यासाठी भोजेकर कुटुंबानी घेतलेला निर्णय खरोखरच स्वागतार्ह, प्रेरणादायी आणि क्रांतिकारी निर्णय आहे. अशा निर्णयापासून लोकांनी प्रेरणा घेऊन कोणतीही खर्चाची उधळपट्टी न करता केल्यास अशा कार्यावर होणारा खर्च घरगुती अडीअडचणीच्या वेळी नक्की कामी येऊ शकतो.

तुळशीराम भोजेकर हे महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे शिक्षक होते. त्यामुळे गुरू पौर्णिमा यांचे औचित्य साधून गडचांदूर तालुका संघर्ष समिती गडचांदूरने स्वागत समारंभ आयोजित केला होता.  गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ ला दुपारी तीन वाजता स्थळ-विठ्ठल मंदिर येथे श्री. तुळशीराम गोपाळराव भोजेकर आणि त्यांची पत्नी सौ. ज्योतीताई तुळशीराम भोजेकर यांचा शाल, श्रीफळ, साडी चोळी, पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांची सुरूवात महिला भजन मंडळाच्या स्वागत गीताने करण्यात आली. दिपक महाराज पुरी, डॉ. के. आर. भोयर, शिवाजी सेलोकर, निलेश ताजने आणि स्वागतमुर्ती तुळशीराम भोजेकर इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.

सत्कार समारंभास विठ्ठल रखुमाई मंदिराचे विश्वस्त श्री दिपक महाराज पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. के. आर. भोयर, शिवाजी सेलोकर, निलेश ताजने, उद्धव पुरी, अशोककुमार उमरे, अरुण डोहे मा. नगरसेवक, संपादक प्रभाकर खाडे, सतीश उपलेंचवार, प्रेमदास मेश्राम, मदन बोरकर, मधुकर चुनारकर, पौर्णिमा अशोककुमार, गौतम भसारकर, प्रा. भानुदास पाटील, रफिकभाई निजामी, प्रा. मेहताब शेख, विठ्ठल पुरी, दत्ता पुरी, सुरेंद्र गोहकार, श्री. विलास लोहे, डॉ.सौ. मंजुषा मत्ते मॅडम,  सौ. सविता जेणेकर , श्री. दशरथ सातपाडी , श्री. संदीप मिटकर, श्री. ताराचंद पाचभाई, श्री. गणेश ठावरी, श्री. संजय बुजाडे, श्री. मोरेश्वर तिखट, श्री. वासुदेव वैरागडे, श्री. प्रमोद कोंगरे, श्री. संतोष खनके, श्री. अनिल ठाणेकर, श्री. श्यामराव विधाते आणि समस्त मित्र मंडळ आणि महिला भजन मंडळानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडचांदूर तालुका संघर्ष समितीचे मुख्य संघटक उद्धव पुरी, प्रास्ताविक सचिव अशोककुमार उमरे आणि आभार प्रदर्शन विलास लोहे यांनी केले.

COMMENTS

You cannot copy content of this page