दशबल पहाडी येथे माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म परिषद संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

दशबल पहाडी येथे माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म परिषद संपन्न.

मानसिक शांतता व दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी धम्म आचरणात आणने आवश्यक – भिक्खु कुसलामुनी बौद्धगया

गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार भंडारा :- दशबल पहाडी भिक्खू संघ, सितेपार / हत्तीडोई (ता. जि. भंडारा) यांच्या वतीने माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त आयोजित ३२ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन दि. ०१ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी दशबल पहाडी परिसर, सितेपार / हत्तीडोई येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
बुद्धकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दशबल पहाडी परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच संपूर्ण मानवजातीला शांती, समता व करुणेचा संदेश देणाऱ्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा, या उदात्त उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या धम्म परिषदेत भिक्खूनी संघप्रिया महाथेरी, भिक्खू धम्मज्योती, भदंत सुगतबोधी महाथेरो, भिक्खू शिलरतन, भिक्खू मैत्रय, भिक्खूनी सुप्रज्ञा, भिक्खूनी आम्रपाली तसेच इतर भिक्खू-भिक्खूनी संघ यांनी उपस्थित अनुयायांना धम्मदेशना करत बुद्ध धम्माचा मार्ग, नैतिक जीवनमूल्ये आणि सामाजिक समतेचे महत्त्व विशद केले. प्रत्येक अनुयायांनी  धम्म आचरणात आणण्याची अत्यंत आवश्यकता आहे. धम्म आचरणात आणले तर मानसिक शांतता आणि खरा आनंद मिळतो, दुःखातून मुक्ती व आत्मज्ञान मिळण्यास मदत होते, माणूस विकारांपासून मुक्त होऊन सदाचारी बनतो. थोडक्यात, धम्म म्हणजे केवळ पूजा-पाठ नसून, कृतीतून सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारणे होय असा उपदेश भिक्खु कुसलामुनी बौद्ध गया बिहार यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन भिक्खु कुसलामुनी बौद्ध गया बिहार यांच्या अध्यक्षतेखाली रोषणभाऊ जांभुळकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अमृत बन्सोड यांनी दशबल पहाडीची ऐतिहासिक पार्श्वभूमी सविस्तरपणे मांडून या परिसराच्या प्राचीन वारशाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास व्ही. एस. चुरहे (कार्यकारी अभियंता, जि. प. भंडारा), प्यारेलालभाऊ वाघमारे (माजी जि. प. सदस्य), प्रा. प्रियदर्शन सोनटक्के, सूर्यभान हुमने, श्रीकृष्ण देशभ्रतार, प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे, शिवदास वहाने, सौ. अलका रंगारी, सौ. वैशाली चव्हाण, डॉ. रतनकुमार गेडाम, सिद्धार्थ गजभिये, दिनेश वासनिक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
समता सैनिक दल च्या वतीने बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान लहान मुला-मुलींनी बुद्ध-भीम गीतांवर सादर केलेल्या उत्स्फूर्त नृत्याने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले, तर त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. तसेच कलावंत शिवदासजी वहाने यांनी आपल्या सुमधुर गायनातून श्रोत्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमास बहुसंख्य अनुयायी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश कांबळे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मदनपाल गोस्वामी यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन भिक्खूनी संघप्रिया व डॉ. देवानंद नंदागवळी यांनी केले.

COMMENTS

You cannot copy content of this page