गौतम नगरी चौफेर (गौतम नगरी चौफेर) – चंद्रपूर, देशातील सर्व कोळसा खाणीसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीमधील वेकोलिच्या शेकडो जमिनींना प्रति एकर ३० लाख रुपये देण्याबाबत कोल इंडियाने तत्वतः मान्यता दिली आहे. कोल इंडिया व्यवस्थापन, राज्य सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज येथे झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल, वेकोलिचे अध्यक्ष मनोज कुमार, प्रधान सचिव (ऊर्जाविभाग) आशिषकुमार सिंह, जिल्हाधिकारी विनय गौतम, जिल्हा खनिकर्म अधिकारी सतीश उगे, तसेच वेकोलि व ओबीसी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यत: वणी क्षेत्रातील पेंच, पाटाळी, मोहर्ली, कोलार पिपरी, राजुरा, बल्लारपूर, टेकाडी, गोवसा, मुकुटबन, गोंडखैरी, माजरी, उबाळा आदी खाण परिसरातील जमिनी अधिग्रहित करण्यासाठी कोल इंडिया प्रति एकर ३० लाख रुपये देण्यास तत्वतः तयार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या संदर्भातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

यासंबंधी कोल इंडिया समवेत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ मध्ये निश्चित झालेल्या जमिनीच्या किंमतीनुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, भू-स्वामींना योग्य मोबदला मिळावा यासाठी जमिनीच्या किमतीचा दर प्रतिवर्ष १० टक्के वाढवून शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला वाढवावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईत सोलातियम व इतर सुविधा देखील समाविष्ट कराव्यात, अशी सूचना कोल इंडिया व्यवस्थापनाला दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, बल्लारपूर व राजुरा तालुक्यातील खाणींमध्ये विविध खाणींसाठी शेतकऱ्यांची जमिनी अधिग्रहणासाठी घेतली जात आहे. मात्र, अद्याप त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलले असून, याबाबत सविस्तर निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे बैठकीत कोल इंडिया वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


COMMENTS