– कोरपना तालुक्यातील गाडेगावात कोळसा खाण होणार
गौतम नगरी चौफेर (गौतम नगरी चौफेर) – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालूक्यातील : वेकोलिच्या वणी क्षेत्रातील सर्वात मोठी खुली कोळसा खाण असलेल्या पैनगंगा कोळसा खाणीचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. कोळशाची वाढती मागणी लक्षात घेता पैनगंगा खुल्या कोळसा खाणीची दुसरी कोळसा खाण गाडेगाव खाण या नावाने सुरू होत आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या सेक्शन ९ ची अधिसूचना वेकोलिकडून जाहीर केली आहे. या कोळसा खाणीसाठी गाडेगावसह ८ गावांतील जमिनीचे कोळसा खाणीसाठी अधिग्रहण करण्यात येणार आहे.
वेकोलिच्या वणी क्षेत्रातील सर्वात मोठी उत्पादन देणारी कोळसा खाण म्हणून पैनगंगा खुल्या कोळसा खाणीचे नाव घेतले जाते. विरूर गावाजवळ कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे आढळून आल्याने वेकोलिने काही वर्षांपूर्वी विरूर गावाचे पुनर्वसन केले. यानंतर टप्पाटप्प्याने वेकोलि प्रशासनाने परिसरातील जमिनींचे अधिग्रहण केले. मात्र, कोळशाची वाढती मागणी लक्षात घेता आता पैनगंगा खुल्या कोळसा खाणींचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. पैनगंगा खुल्या कोळसा खाणीची दुसरी कोळसा खाण गाडेगाव या नवीन नावाने सुरू करण्यात येणार आहे. खाणीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहण सेक्शन ९ ची अधिसूचना वेकोलि प्रशासनाने १५ एप्रिलला जारी केली आहे. या गाडेगाव खुल्या कोळसा खाणीसाठी विरूर, सोनुर्ली, गाडेगाव, कविठगाव, खैरगाव, हिरापूर, सांगोडा, कारवाई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.


COMMENTS