अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या डम्पिंग यार्डमधून सतत येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक ञस्त

HomeNewsनागपुर डिवीजन

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या डम्पिंग यार्डमधून सतत येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक ञस्त

गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे)
गडचांदूर –  माणिकगड येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या डम्पिंग यार्डमधून सतत येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संतापाला काल रात्री उधाण आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक सागर ठाकूरवार यांनी नागरिकांच्या भावना व्यक्त करत कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या काचा फोडून तीव्र निषेध नोंदवला.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दुपारी १२ वाजता, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या सर्वपक्षीय मोर्च्याने कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली. नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्र येत, कंपनीच्या प्रदूषण कारभाराविरोधात एकमुखाने आवाज उठविला.

प्रमुख वक्त्यांचे मनोगत:
आंदोलन स्थळी विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली व कंपनीला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की:

मनोज भोजेकर – “शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे, प्रशासन आणि कंपनीला आता कठोर भूमिका घ्यावी लागेल.”

निलेश ताजने – “दुर्गंधी आणि धुळीच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे.”

सचिन भोयर, धनंजय छाजेड, मधुकर चुनारकर, संदीप शेरकी, विक्रम येरणे, आशिष देरकर, रफिक निजामी, सतीश बिडकर, हंसराज चौधरी, अरुण निमजे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत नागरिकांच्या समस्यांवर ठामपणे भाष्य केले.

कंपनीकडून आश्वासन:

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. मुकेश गहेलोत यांनी आंदोलनस्थळी येत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट सांगितले की:

> “येणाऱ्या काळात शहरात दुर्गंधी पसरणार नाही याची हमी आम्ही देतो. त्यासाठी कंपनीकडून तांत्रिक उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तसेच, पुढील पाच ते सहा महिन्यांत गडचांदूर शहर धुळीच्या प्रदूषणापासूनही मुक्त करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवण्यात येत आहे.”



नागरिकांचा निर्धार:

या आंदोलनातून गडचांदूरकरांनी एकमुखाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की जर कंपनीने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.

गडचांदूरचा श्वास घेण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या कोणत्याही प्रदूषणकारी कारखान्याचा निषेध करून, नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page