गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) – दुर्गापूर वेकोली कोळसा खदानीत कार्यरत केव्हीआर कन्स्ट्रक्शन या माती उत्खनन कम्पनीत स्थानिक भुमिपुत्राना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने तारीख ५ डिसेंबर २०२५ ला एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

या धरणे आंदोलनास विविध पक्ष आणि संघटना पाठिंबा देण्यासाठी सरसावल्या आहेत. यात प्रामुख्याने याच परिसरातील ग्रामपंचायत चोरगावच्या वतीने ग्रामपंचायत सरपंचा तृणाली देवानंद धंदरे यांनी पुढाकार घेऊन पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि तथागत पेटकर, तसेच शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे यांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि कंत्राटी कामगार सेनेच्या वतीने, भीमराज सेनेचे सेनाप्रमुख राजूभाऊ थाटे, मानवाधिकार संरक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवनभाऊ वाघमारे, शिवसेना पॅरामेडिकल विंग महाराष्ट्रचे जिल्हा प्रमुख प्रशांत बिट्टूरवार, आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष राजूभाऊ कुडे, संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूरचे अध्यक्ष छोटू दहेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हा अध्यक्ष गौतम तोडे इत्यादी पक्ष आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे.

या भागात कार्यरत केव्हीआर कन्स्ट्रक्शन या माती उत्खननाचे काम धुमधडाक्यात सुरू आहे आणि या कंपनीने स्थानिक भुमिपुत्राना केवळ कंपनीत कामावर घेऊ असे खोटे आश्वासन देत परप्रांतीय कामगारांच्या वतीने काम सुरू आहे. याचा जाब विचारण्यासाठी दिनांक ५ डिसेंबर २०२५ ला कंपनी गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.


COMMENTS