विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.

HomeNewsनागपुर डिवीजन

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.

– चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज.
– कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह.
– मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची मागणी.

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) – 22 डिसेंबर विरूर वनपरीक्षेत्र अंतर्गत कक्ष क्रमांक 126(1) कोष्टाळा येथे चार ते पाच दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात जंगू रामू आत्राम (50 वर्ष ) राहणार बगलवाही या शेताकऱ्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह अर्धा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान वनविभागातर्फे मृतकाच्या परिवारास अंत्यविधी करिता पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली असून उद्या सोमवार ला बँक उघडल्यावर आणखी दहा हजारांची अशी एकूण पंचेवीस हजाराची मदत दिली जाईल.
प्राप्त माहितीनुसार मृतक जंगू रामू आत्राम हा आपल्या शेतात कापूस वेचणी करिता गेला होता. चार दिवस लोटूनही तो घरी परत न आल्याने मृतकाच्या बहिणीला शेतात दुर्गंधी आल्याने त्या दिशेने बघताच जंगू आत्राम याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वनअधिकारी पवनकुमार जोंग, सहाय्यक वनसंरक्षक तथा परिविक्षाधीन अधिकारी प्रकाश अवधुतवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहाय्यक डि.एम.गेडाम व वनकर्मचारी , विरुर पोलीस घटनास्थळी पोहचून मोका पंचनामा केला. परंतु मृतदेह उचलन्यास परिवारातील नातेवाईकाणी व गावातील व्यक्तींनी नकार दिल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. डाव्या हाताला व मानेच्या खाली घाव आढळून आल्याने तसेच घटनास्थळी असलेल्या परिस्थिती वरून हा हल्ला वाघाने केला असून तात्काळ नुकसान भरपायी मिळावी म्हणून गावकर्यांनी आक्रोश केला. घटना स्थळावरून मिळालेल्या प्राण्याच्या केसांचे नमुने, पाऊलखुणा आणी घडलेला प्रकार बघता जवळपास पन्नास ते शंभर फूट अंतरावर मृतदेह फरकट नेल्याचे सुद्धा आढळून आले. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यातच हा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी तपासात दिसून येत आहे. दरम्यान मृतदेह राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदना करिता आणला असून घटना स्थळी मिळालेल्या केसांचे नमुने उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात येणार असल्याचे वनविभागाद्वारे कळविण्यात आले. मृतकाच्या परिवाराला अंतिम संस्काराकरिता पंचेवीस हजाराची मदत जाहीर केली असून त्यातील पंधरा हजार देण्यात आले तर उर्वरित दहा हजार बँक बंद असल्याचे कारण देत उद्या देण्यात येणार आहेत. यावेळी मुतकाची बहीण, मुलगी, जावई, गावकरी, शिला जाधव, वनविभागाचे डी. एम. गेडाम, क्षेत्र सहाय्यक कोष्टाळा, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

कोट
बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था

सदर घटना ही वाघाच्या हल्याने झाली  असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृतक आदिवासी कोलाम असून घरातील कर्ता पुरुष होता. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. मुलगी विवाहित आहे. घरची परिस्थिती बघता शासनाने मृतकाच्या परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत देऊन या परिसरात मोठया प्रमाणात गस्त घालून मानव -वन्यजीव संघर्ष टाळावा,  सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात लावून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा पुरेसा मनुष्यबळ वाढवावे तसेच ड्रोन च्या माध्यमातूनही गस्त घालावी अशी मागणी बादल बेले यांनी केली आहे.

कोट
संतोष कुंदोजवार, वन्यजीव प्रेमी
कोष्टाळा परिसरातील घटना लक्षात घेता याठिकाणी वनविभागाने पुरेसा बंदोबस्त वाढवावा तसेच ड्रोन च्या माध्यमातून लक्ष ठेवावे आणी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS