सर्वच परप्रांतीय नावे
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी कोरपना) : कोरपना तालुक्यात शहरात व ग्रामीण भागात एकूण ६२ बुथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येते.
निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बोगस नोंदणी कशी उघड झाली?
मतदार यादीतील नावे आणि नोंदणीकृत माहितीची सखोल छाननी सुरू असताना काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर प्रशासनाने मतदार यादी तपासली असता, अनेक बोगस मतदारांची नोंदणी आढळली. हजारो परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ऑनलाईन अर्ज रात्री १२.०० वाजताच्या नंतर भरण्यात आल्याचे दिसून आले.
सुदृढ व मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली गेली पाहिजे. बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्या संगणकावरून हे काम करण्यात आले आहे त्याचा आयपी पत्ता शोधून दोषींवर कठोर कारवाई करावी.
आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी
प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेतली असून गावागावात बीएलओच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम चालू आहे. मतदार गावात उपस्थित आहे की, नाही याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यात येत असून हजारो ऑनलाईन नोंदणी केलेले मतदार बोगस असल्याचे आढळून आले आहे.
युवकांना पैसे देऊन भरले अर्ज
गडचांदूर येथील एका कार्यालयात आजूबाजूच्या गावातील काही युवकांना पाचशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे मजुरी देऊन, मतदाराची बोगस नावे, त्यांचे आधार क्रमांक, चुकीचा मोबाईल क्रमांक व ओटीपी पुरवून अर्ज भरायला लावले असल्याची विश्वासनीय माहिती आहे. विशेष म्हणजे वेबसाईटवर फोटो अपलोड करण्याच्या ठिकाणी भिंतीचा फोटो व आधार अपलोड करण्याच्या ठिकाणी भिंतीचाच फोटो अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाइन उपलब्ध झालेल्या यादीमध्ये बोगस मतदाराचा फोटो उपलब्ध नाही.
तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, लखमापूर, नांदा, बिबी, बाखर्डी, आवाळपूर, उपरवाही या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांची नोंद झालेली आहे.
Older Post
सकल मातंग समाजाचा जीवतीत जल्लोष
COMMENTS