वृद्धांना ओझे न समजता कर्तव्य म्हणून सांभाळा <br>ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त – अमृत बन्सोड यांचे प्रतिपादन

HomeNewsनागपुर डिवीजन

वृद्धांना ओझे न समजता कर्तव्य म्हणून सांभाळा
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त – अमृत बन्सोड यांचे प्रतिपादन

सीनिअर सिटीजन मल्टीपरपज असोसिएशनचे आयोजन

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज घडीला देशात १० कोटी वृद्ध आहेत .पुढे २०५० पर्यंत ते 32 कोटीच्या घरात पोहोचतील. त्यावर आत्ताच विचार व्हायला पाहिजेत. वृद्धत्व सुखकारक होण्यासाठी तरुणांनी त्यांच्या साठीनंतरचे आर्थिक, शारीरिक ,कौटुंबिक , सामाजिक नियोजन करावे तरच त्यांचे वार्धक्य सुखाचे होईल. परंतु सुखाने जीवन जगण्याची इच्छा असूनही कौटुंबिक व इतर जबाबदारीमुळे मुलाबाळा व कुटुंबाच्या सुखासाठी आतापर्यंत जगणाऱ्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात नेणे हे लाजिरवाणे आहे. हा मातृत्वाचा अपमान व पितृत्वावर मोठा प्रहार आहे. वृद्ध आई-वडील म्हणजे ओझे अशी अलीकडे भावना निर्माण झाली आहे .परंतु वृद्धांना ओझे न समजता त्यांच्या मुलाबाळांनी कर्तव्य म्हणून त्यांना सांभाळले पाहिजे.” असे विचार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांनी व्यक्त केले. जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त सीनिअर सिटीजन मल्टीपरपज असोसिएशन द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक  सभागृह नाशिकनगर,भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माज नगराध्यक्ष महेंद्र गडकरी होते.
   याप्रसंगी महादेव मेश्राम, एम डब्ल्यू . दहिवले ,इंजिं. रामटेके यांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले. महेंद्र गडकरी म्हणाले की ज्येष्ठांनी सुद्धा काळानुरूप बदलून मुलांबळा सोबत समरस व्हावे. तरुणांनी वृद्धांच्या अनुभव व ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा. ‘हम तो हमारे दो’या चौकोनात न अडता वृद्धांनाही तिथे जागा द्यावी.
   कार्यक्रमाचे संचालन सीनिअर संघटनेचे सचिव गुलशन गजभिये यांनी केले तर आभार करण रामटेके यांनी मानले कार्यक्रमासाठी लता करवाडे, चिंतामण बोरकर ,मुनींद्र सत देवे, आहूजा डोंगरे यांनी सहकार्य केले. शेवटी ज्येष्ठांनी जेष्ठांचे सामूहिक स्वागत केले.

COMMENTS