संविधान कुणी बदलू शकत नाही – रामदास आठवले

HomeNewsनागपुर डिवीजन

संविधान कुणी बदलू शकत नाही – रामदास आठवले

गौतम नगरी चौफेर ( राहुल हंडोरे कसारा ) दि. 5 नोव्हेंबर 24 डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान कुणी बदलू शकत नाही असे उदगार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांनी कसारा येथे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिवंगत देविदास भोईर यांच्या श्रद्धांजली सभेत प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना काढले. अध्यक्ष स्थानी रिपाईचे ठाणे पालघर उपाध्यक्ष सुहास जगताप होते.

रिपाईचे कसारा विभागाचे अध्यक्ष देविदास भोईर यांच्या श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम मिलिंनगर कसारा येथे आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ना. आठवले हे बोलत होते. शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मी रामदास आठवले, आम्ही दोघांनी मिळून शिवशक्ती भीमशक्तीची स्थापना केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेना आणि पॅन्थर मधील वाद निवळला होता. ठिकठिकाणी होणाऱ्या हाणामाऱ्या थांबल्या होत्या असेही रामदास आठवले म्हणाले. यावेळी एकलाख रुपयांची मदत आठवले यांनी जाहीर केली.

या प्रसंगी झालेल्या श्रद्धांजली सभेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे म्हणाले की, कसारा विभागातले दलित पँथर शिवसेना दंगली मधील वाद मिटविण्याचे काम देविदास भोईर यांनी केले होते. शहापूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार दौलत दरोडा म्हणाले की, रेल्वेच्या समोरील गेटला देविदास भोईर यांचे नाव दयावे अशी त्यानी सुचना केली. रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश लोंढे म्हणाले की, डोक्याला निळे कफन बांधून रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता देविदास भोईर होता. महिला आघाडीच्या केंद्रीय उपाध्यक्ष शिलाताई गांगुर्डे म्हणाल्या की, घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाची काय अवस्था होते यांची आम्हाला कल्पना आहे.

या प्रसंगी पांडुरंग बरोरा, विद्या वेखंडे, किसन भेरे, रघुनाथ कदम, राहुल शेजवळ आदींची श्रद्धांजली पर भाषणे झाली.  या प्रसंगी सर्वश्री हेमंत रणपिसे, शान्तिभाई शेजवळ, अनिल गांगुर्डे, राहुल हंडोरे, जयवंत थोरात, विनोद थोरात, शशी उबाळे, आदी समाजसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुनील जगताप यांनी केले.

COMMENTS

You cannot copy content of this page