गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) मी जळगाव शहरालगत वाघनगर येथे राहातो.तेथील लोक जेमतेम शिक्षण करून नशीबाने नोकरीला लागले. घर स्वस्त मिळते म्हणून वाघनगरला येऊन राहू लागले. आम्ही धड ग्रामीण ही नाहीत, धड शहरी पण नाहीत.
या भागात गणपती, शिवजयंती, नवरात्री चे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. काही तरूण वर्गणी जमा करून सजावट, डिजे वगैरे आणून आपली हौस भागवून घेतात. काही मंडळे या उत्सवांना आमदार खासदार मंत्री यांना बोलवून सत्कार करतात. सत्कार करायचा तर काहीतरी कारण असेलच. फुकट कोणी कोणाचा सत्कार का करील? हे आमदार खासदार मंत्री लोक मंडळांना देणगी देऊन आपले कौतुक करवून घेतात. बैनर, फोटो, गाजावाटा. जसा कोणी महात्मा आला आहे. गणपती, शिवजयंती, नवरात्री हे जळगाव जिल्ह्यातील राजकीय चोरांचे पापक्षालनाचे उत्सव बनलेले आहेत.
मी यांना महात्मा म्हणतो.तसे पुण्यकर्म केले आहे, यांनी. गुलाबराव पाटील, गुलाबराव देवकर, अनिल पाटील असे लोक येऊन या मंडळांना आशिर्वाद देऊन जातात. पण या गावात रस्ता बनवण्यासाठी निधी देत नाहीत. म्हणून मी यांना महात्मा म्हणतो, उपरोधाने.
मी स्वतः गुलाबराव देवकर, गुलाबराव पाटील यांना विनंती केली कि, तुम्ही उत्सवात येऊन भाषणे ठोकण्याऐवजी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या. पण यांनी मनावर धरले नाही. म्हणे तुम्ही वाघनगरचे लोक रस्ता मोजून घेतात. त्यामुळे कोणी ठेकेदार रस्त्याचा ठेका घेत नाही. आम्ही शिक्षित आहोत, हा आमचा दोष आहे का?अशिक्षित आमदार निवडून देण्याचा हा परिणाम आहे.
खरे तर रस्ता बनवणारे ठेकेदार याच आमदारांचे आहेत. आडू, माडू, साडू, लाडू . त्यासाठीच तर हे आमदार निवडून आलेले असतात. आणि या चोरीतून आम्हाला देणगी देतात म्हणून आम्ही यांना मतदान करतो.
या आमदारांनी उत्सवाला देणगी देण्याऐवजी रस्ता बनवण्यासाठी निधी किंवा देणगी दिली पाहिजे. कारण मंडळांना दिलेली देणगी आमची तरूणांना बिघडवते. उत्सव संपल्यानंतर याच देणगीतून दारू, मटण वगैरे ची पार्टी होते. त्यामुळे मिसरूड न फुटलेली पोरं दारू पितात. उरले सुरले मटण आई बापाला आणून खाऊ घालतात.त्यामुळे ते पण पोरांना आवर घालत नाहीत. दारू पिऊन पोरगा बधीर होतो.मटण खाऊन बाप बधीर होतो. त्यामुळे मुलांच्या भविष्याचा विचार करीत नाहीत.पोरांना खान पान मिळते म्हणून मंडळात राबतात. नाचतात. ते दहा दिवस, ते नऊ दिवस डी जे वाजवतात. तितके दिवस अभ्यास कडे लक्ष देत नाहीत. अभ्यास मागे पडतो. बाकीचे इतर तरूण पुढे निघून जातात. आता त्यांचे सोबत बसलो तर कमीपणा वाटू लागतो.मग शाळा कॉलेज ला दांडी मारणे सुरु होते. आई बापाला कळतही नाही कि आपला मुलगा कोणत्या अवस्थेत पोहचला आहे.
मागील दहा बारा वर्षात येथे आमदार आला. येथे खासदार आला.येथे मंत्री आला.पैकी एकानेही सांगितले नाही कि मी तुमचे रस्ते बनवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देतो. म्हणून यांना नालायक आमदार, नालायक खासदार, नालायक मंत्री म्हणतो.ते आम्हाला मुर्ख मतदार समजतात.
आतापर्यंत येथे धर्म निहाय मंडळे होती.आता जातीनिहाय मंडळे बनवली आहेत.या मुळे कमी बुद्धी ची पोरं लवकर आकर्षित होतात.जितकी संकुचित वृत्ती तितकी संघटना मजबूत.आता तर येथील घरांवर आपली जात ,धर्म प्रदर्शित करणारे झेंडे लागलेले आहेत.ही पहा माझी जात.
एकिकडे जातिनिर्मुलन करा असे म्हणणारी माणसे इतरांपेक्षा जास्त जातीवाचक दिसतात.समानता आणा असे म्हणणारी माणसे स्वताला असमान समजतात.तसे या झेंड्यातून संदेश देतात.आता तर वाघनगर आणि जळगाव मधे जातीनिहाय ओपन स्पेस वाटप झालेली आहेत.जाती निहाय समाज मंदिरे बनलेली आहेत.जातीनिहाय निधी उपलब्ध करून दिला आहे.म्हणून आमदार खासदार मंत्रीला मी नालायक म्हणतो.
कोणाचा जाती वाचक उल्लेख केला तर गुन्हा दाखल होतो.पण तोच स्वताच्या जातीचे स्तोम माजवत असेल तर गुन्हा दाखल होत नाही.असे हे जातीचे उफराटे थोतांड आहे.
जातीव्यवस्था कधीच नष्ट होणार नाही.पण दैनंदिन जिवनात अडचणही ठरत नाही.तरीही हे स्तोम कशाला?
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



COMMENTS