गडचांदूरात तिकिटासाठी धावपळ; नेत्यांचे समीकरण बिघडले !

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदूरात तिकिटासाठी धावपळ; नेत्यांचे समीकरण बिघडले !

☝️उमेदवार ठरले, पण घोषणेची प्रतीक्षा☝️

गौतम नगरी चौफेर ( गौतम धोटे) – नगर परिषद निवडणुकीची घोषणा होताच गडचांदूरचे राजकीय वातावरण अचानक तापले आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तिकिटासाठी चढाओढ सुरू असून, अनेकांच्या दावेदारीमुळे नेत्यांचे समीकरण बिघडल्याची स्थिती दिसून येत आहे. यामुळे अपक्ष उमेदवारांची रेलचेल सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच निवहणुकीची घोषणा झाली असून, नामांकन भरण्याच्या प्रक्रियेला आखरिच्या दिवसांचा कालावधी आला आहे. त्यामुळे आतापर्यंत पक्षाचा निर्णय येण्याची वाट पाहत असलेले आता मी सुद्धा ‘उमेदवार’ या घोषवाक्यासह थेट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. परिणामी गडचांदूर शहरातील प्रत्येक गल्ली व चौकात कोणत्या पक्षाकडून कोण लढणार आणि तिकीट कुणाला मिळणार, या चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे पक्षाकडून तिकीट मिळण्याची वाट पाहणाऱ्या काही कार्यकत्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत बंडखोरी आणि अपक्षांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. शहरातील राजकीय जाणकारांच्या मते, यावेळी सामना फक्त पक्षांपुरता मर्यादित राहणार नाही.

मतदारांचा दृष्टिकोन शिक्षित, पारदर्शक आणि स्थानिक उमेदवारांकडे झुकताना दिसत आहे. मतदारांना जो त्यांच्या प्रभागातील समस्यांना ओळखतो आणि प्रत्यक्ष कृतीतून उपाय करेल, असा उमेदवार हवा आहे. अनेक प्रभागांमध्ये आपल्या प्रभागातूनच उमेदवार असावा, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी पती आपल्या पत्नीला उमेदवार म्हणून पुढे करीत आहेत. तर काही ठिकाणी नारीशक्ती स्वतःच्या बळावर

मैदानात उतरणार असल्याने राजकीय समीकरणात नवीन रंग भरले जाणार आहेत. दरम्यान, पक्षांच्या कार्यालयांमध्ये अजूनही तिकीट वाटपावरून अस्वस्थता असून,  काही ठिकाणी आंतरिक नाराजी आणि गटबाजी उफाळून येत आहे. जुन्या नेत्यांचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. तर नवे चेहरे आणि सामाजिक कार्यकर्ते तिकिटाच्या जोरावर स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता सर्वांचे लक्ष नामांकन प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने कोण पक्षासोबत राहतो, कोण बंडखोर ठरतो आणि कोण जनतेचा विश्वास संपादन करतो, हे स्पष्ट होणार नक्किच आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page