समाजसेवा आणि राजकारण म्हणतात.आमचे नगरसेवक,झेड पी सदस्य, आमदार खासदार मंत्री यांचा मुख्य धंदा सरकारी निधीतून चोरी करणे हाच आहे.
गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव ) – वाटते तरूणांना कि आपण इतिहास वाचला तर आपण इतिहास घडवावा. त्यातील राजा,राणी, प्रधान, सेनापती यांचे पराक्रम,विक्रम पाहून आपण पण राजा व्हावे.आपणही तसा इतिहास घडवावा.तसे जगावे.वगैरे वगैरे.पण यासाठी भांडवल लागते.एकतर तो मल्हारराव होळकर यांच्या सारखा कमी वयात जास्त हिंमत दाखवणारा पाहिजे.किंवा लाल बहादूर शास्त्री यांच्या सारखा तत्वनिष्ठ, एकनिष्ठ आणि प्रामाणिक पाहिजे.असे काहीतरी गुण असल्याखेरीज समाजात शोभून दिसणार नाहीत.
गरीबांसाठी सर्वात चांगले गुरू म्हणजे महात्मा गांधी.वारसा,संपत्ती,शिक्षण असूनही गरीबीचे रूप घेऊन गरीबांना सोबत घेऊन गरीबांसाठी राजकारण केले.विलायतचे शिक्षण,ती पदवी,तो कोट सूट वगैरे उतारून धोती पंचा वापरणे म्हणजे खूप आत्मविश्वास,आत्मसंयमन,आत्मनियमन,आत्मनियंत्रण,आत्मसमर्पण करणारे गांधीजी अद्वितीय.तरीपण अनुकरणिय.जे कोणालाही सहज शक्य आहे.लाल बहाद्दर शास्त्री,विनोबा भावे,साने गुरुजी, जयप्रकाश नारायण,आण्णा हजारे यांनी हाच मार्ग अवलंबला.रंक माणूस राजा सारखा जगू शकतो.जगले.जगता येते.
मी शेती आणि शेत मजूरी करणाऱ्या अशिक्षित बापाचा मुलगा.मला जिल्हा परिषद शाळेने शिक्षण दिले.शेळ्या,गाई,गुरे हाकताना इतिहास वाचून राजकीय ज्ञान घेतले.वारसा आणि पैसा नसतांना माणूस राजकारण कसे करू शकतो,यांचा अभ्यास केला.तर मला महात्मा गांधी यांच्या कडून धडे मिळाले.विचारांचे आणि आचारांचे. गांधीजी, शास्रीजी यांचा अभ्यास करता माणूस घडत जातो आणि त्या दिशेने मिळेल त्या वाटेने जात असतो.मी गेलो.
शेतीच्या तुटपुंज्या साधनांवर फक्त उदरनिर्वाह होऊ शकतो.म्हणून शिक्षण घेऊन काही काळ नोकरी करणे अपरिहार्य बनले.म्हणून रेल्वेत स्टेशन मास्तर ची नोकरी धरली.नोकरी करतांना आधिकाराचा आपोआप माज चढतो.पदाचा गैरवापर करता येतो. यातून स्वताला शाबूत ठेवणे जास्त कठीण नाही.आपल्या गरजा मर्यादीत ठेवल्या कि सहज शक्य होते.सवय जडते.मग आर्थिक प्रश्न सतावत नाहीत.मग उधारी,कर्ज,अनुदान वगैरे ची सुद्धा गरज पडत नाही.चोरी,लांचखोरीची गरज पडत नाही.गरज नसेल तर घरफोडी का करावी?गरज असली तरी का करावी?हे मनावर बिंबवले कि मग दुःख होत नाही.तो श्रीमंत आहे आहे आणि मी गरीब आहोत याचे शल्य वाटत नाही.
तीस वर्षे नोकरी केल्यानंतर राजीनामा देऊन आण्णा हजारे यांच्या आंदोलनाला जोडून घेतले.त्यासाठी भरती करून घेण्याची गरज पडत नाही.त्या मोहिमेत,त्या लढ्यात सहभागी झाले कि माणूस त्यांचा सैनिक होतो.ते जरी थकले तरीही आपण तशीच मोहिम चालवू शकतो.यालाच तर स्वराज्य म्हणतात.लढाई आणि आयुधे वेगळी असू शकतात.
रेल्वेतून नऊ वर्षे आधी स्वेचछा निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात उतरलो.ठेकेदारी,दारूबार, पेट्रोल पंप,शाळा अशी कमाईची साधने नसले तर कोणताही राजकीय पक्ष सोबत घेत नाहीत.राजकिय नेत्यांचे झोऱ्या, सतरंजी उचलण्याची मानसिकता नसल्याने ती करण्याची तयारी नाही.मग काय करणार? राजकारण कसे करणार?
जखम झाली आणि मलमपट्टी केली कि माणूस डॉक्टर बनतो.तसे रस्त्यावर खड्डा दिसला कि बोंब ठोकली कि माणूस समाजसेवक बनतो.कोणावर अन्याय झाला आणि आपण बिबट्यावर हल्ला केला कि माणूस नेता बनतो.ही आपोआप घडणारी प्रक्रिया आहे.स्वभाव बनला कि ते घडते आपल्या हातून.घडले माझ्या हातून.
मुळातच राजकीय सत्तेवर असणारी माणसे हेच जास्त संकटे आणतात.खरे तर नगरसेवक, झेडपी सदस्य, आमदार, खासदार मंत्री हेच मोठे संकट आहे.हिच माणसे समस्या निर्माण करतात.हेच चोर आहेत.यांना सापडेल तेथे बेनकाब करणे, बदनाम करणे यालाच तर समाजसेवा आणि राजकारण म्हणतात.आमचे नगरसेवक,झेड पी सदस्य, आमदार खासदार मंत्री यांचा मुख्य धंदा सरकारी निधीतून चोरी करणे हाच आहे.या चोरांवर प्रहार करणे हाच आपला अजेंडा बनवला कि कोपऱ्यातील माणूस आपोआप उजेडात येतो.हेच तर गांधीजी,जेपी आणि आण्णा हजारे यांनी केले.हेच तर अंजली दमानिया करीत आहेत.समाजसेवा म्हणा किंवा राजकारण म्हणा.प्रामाणिक माणसांचे हेच तर ध्येय,धोरण असते.हेच तर राजकारण असते.
गरीबांना समाजसेवा, राजकारण करणे सहज शक्य आहे.ते या मार्गाने.
आपण जनतेची कामे केली.ओळख निर्माण केली.तर वाटते कि लोक निवडून देतील.म्हणून नगरपालिका आणि विधानसभा लढून पाहिली.पण मतदार राजा पांच वर्षे स्तुती करतो पण मतदानाच्या दिवशी पैसा मागतो.पैसाच कमावला नाही तर देणार कुठून?म्हणून पैसा मागणाऱ्या मतदारांना मी समोरच्या श्रीमंत उमेदवार कडे नेऊन सांगतो.याला पैसा द्या.हा तुम्हाला मतदान करणार आहे.हा नालायक,निच,हरामखोर माणूस आहे.तुम्ही याचे नेते आहात.पैसा देऊन मत विकत घेणे तुमचा हेतू आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो.द्या याला पैसा.मीच माझ्या विरोधातील उमेदवारांना मतदार मिळवून दिले.मते मिळवून दिली.कारण चोरा जवळ भिकारी नेला आणि संतुष्ट केला.याचे पुण्य मला लाभते.त्यामुळे भिकारी खुष आणि तो चोर ही खुष.
जो जे वांच्छिल तो ते लाहो,सकळ प्राणी जात!यापेक्षा सुंदर पसायदान नाही.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लोक माझे सांत्वन करतात.काका, तुम्ही खूप चांगले काम करतात.पण लोक चांगले नाहीत.पैसा घेऊन मतदान करतात.खरे तर याने पण मताचा पैसा घेऊन मतदान केलेले असते.तरीपण मी उत्तर देतो.मी निवडणूक हारलो नाही.मतदार निवडणूक हारलेत.मला चांगला म्हणून ओळखतात तरीपण बिचारे विकले जातात.येथे पराजय माझा नाही.पराजय मतदारांचा आहे.ते स्वत:वर ताबा ठेवू शकले नाहीत.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
१६/११/२०२५


COMMENTS