रविवार सेवा आणि संस्काराचा : विज्ञान शिक्षक प्रमोद साळवे यांचा अनोखा उपक्रम”

HomeNewsनागपुर डिवीजन

रविवार सेवा आणि संस्काराचा : विज्ञान शिक्षक प्रमोद साळवे यांचा अनोखा उपक्रम”

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र) :– बहुतेक जणांसाठी रविवार हा विश्रांतीचा दिवस असतो. मात्र स्वामी विवेकानंद आश्रमशाळा, किरमिरी येथील विज्ञान शिक्षक प्रमोद साळवे यांच्यासाठी रविवार म्हणजे सेवाभाव, संस्कार आणि विद्यार्थ्यांसोबत नव्या उपक्रमांचा दिवस ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणीत आनली आहे. रविवारी मुलांसोबत कधी बागेची निगा राखणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून साफसफाई करणे, तर कधी भाजीपाल्याच्या साली गोळा करून जैविक औषधे तयार करणे असे अभिनव उपक्रम राबविले जातात. राखेचा वापर करून कीड नियंत्रण करण्याचे प्रयोगही ते विद्यार्थ्यांना शिकवतात. 

  आश्रमशाळेत मुले २४ तास उपस्थित असतात, फक्त त्यांच्यासोबत वेळ देणारी व्यक्ती हवी असते, असे साळवे सरांचे मत आहे. “जल, जंगल आणि जमीन यांच्याशी मुलांची नाळ लहानपणापासून जोडली गेली पाहिजे. आपण दिशा दाखवली, की त्यांची दशा आपोआप बदलते,” असे ते सांगतात.
        विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि शाळेत फुलणारी फुले यामुळे वातावरण आनंदमय बनते. नागरिकशास्त्र हा विषय बालपणापासूनच शिकविला गेला पाहिजे, अशी सरांची ठाम भूमिका आहे. “ही शाळा, हे गाव, हा जिल्हा, हे राज्य आणि हा देश माझा आहे हे प्रत्येक बालकाच्या मनात रुजले पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छतेचे भान आणि झाडांची काळजी ही त्यांची स्वतःची जबाबदारी असल्याची जाणीव झाली, तर समाजात सुजाण नागरिक घडतील,” असे ते अधोरेखित करतात. मोबाईल आणि संगणक वापरताना पुस्तकांचा ध्यास जोपासण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली, तर त्यांची बौद्धिक प्रगती होईल आणि देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास ते व्यक्त करतात.

COMMENTS

You cannot copy content of this page