सावंगी (मेघे), वर्धा : मुलीच्या मृत्यूवर पोलिसांची शांतता का? आईकडे ठोस पुरावे असूनही FIR का नाही?

HomeNewsनागपुर डिवीजन

सावंगी (मेघे), वर्धा : मुलीच्या मृत्यूवर पोलिसांची शांतता का? आईकडे ठोस पुरावे असूनही FIR का नाही?

गौतम नगरी चौफेर अर्पित वाहाणे वर्धा प्रतिनिधी –  वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथून समोर आलेला प्रकार केवळ एक संशयास्पद मृत्यू न राहता, आता पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार ठरला आहे. एका तरुणीचा मृत्यू घाईघाईने आत्महत्या म्हणून दाखवला जात असताना, मृत मुलीची आई स्वतः समोर येऊन सांगत आहे की माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले—आणि यासाठी तिच्याकडे ठोस, लेखी व डिजिटल पुरावे उपलब्ध आहेत.
आईचा स्पष्ट आरोप आहे की, मुलीला सातत्याने मानसिक छळ करण्यात आला. “मर”, “तू जगण्यायोग्य नाहीस”, “तू कलंक आहेस” अशा शब्दांत तिचा आत्मसन्मान चिरडण्यात आला. आत्महत्या कशी करावी, कोणत्या पद्धतीने मृत्यू होतो याची माहिती देण्यात आली, तसेच मृत्यूपूर्वी साधन उपलब्ध करून देण्यात आल्याचे गंभीर आरोप आहेत. हे सर्व आरोप साध्या आत्महत्येकडे नव्हे, तर संज्ञेय व गंभीर गुन्ह्याकडे स्पष्टपणे निर्देश करतात.
असे असतानाही सावंगी पोलीस ठाण्यात अद्याप FIR नोंदविण्यात आलेली नाही. केवळ मर्ग नोंद करून तपास मर्यादित ठेवण्यात आला आहे.
यामुळे थेट प्रश्न निर्माण होतो—
👉 आई स्वतः पुरावे घेऊन समोर येत असताना FIR का घेतली जात नाही निष्पक्ष चौकशी कोणाच्या दबावाखाली रोखली जात आहे? दोषींना वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना?
सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या निर्णयानुसार, संज्ञेय गुन्ह्याची माहिती मिळताच FIR नोंदविणे बंधनकारक आहे. तरीही पोलिसांकडून होत असलेली ही दिरंगाई कर्तव्यातील गंभीर कसूर की जाणीवपूर्वक दुर्लक्ष, असा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
हा प्रश्न आता एका कुटुंबापुरता मर्यादित राहिलेला नाही. हा न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा कस आहे. जर हा मृत्यू आत्महत्या असेल, तर ते निष्पक्ष तपासातून सिद्ध व्हावे. पण जर हा प्रकार आत्महत्येस प्रवृत्त करून घडवून आणलेला मृत्यू किंवा कटातून केलेली हत्या असेल, तर दोषींना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न जनता खपवून घेणार नाही.थेट आणि स्पष्ट मागण्या या प्रकरणात तात्काळ FIR नोंदविण्यात यावी. प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र व वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी. सर्व मोबाईल, कॉल रेकॉर्ड, व्हिडिओ, संदेश व डिजिटल पुरावे तात्काळ जप्त करावेत.
FIR नोंद न करणाऱ्या अधिकाऱ्यांची जवाबदारी निश्चित करावी. पीडित आईला न्याय व संरक्षण देण्यात यावे. ही शांतता संशयास्पद आहे. न्याय न मिळाल्यास आवाज आणखी तीव्र होईल.

COMMENTS

You cannot copy content of this page