गौतम नगरी चौफेर विनोद खंडाळे गडचांदूर – शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट आणि नियोजनशून्य कामामुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. जीआर इन्फ्रा कंपनीने घेतलेल्या या प्रकल्पात न केवळ रस्त्यांची डागडुजी करण्यात दुर्लक्ष केले, तर स्थानिक नागरी सुविधांचा पूर्ण विसर पडल्याचे चित्र आहे. परिणामी, गडचांदूरकर अक्षरशः संकटाचा सामना करत आहेत.
शहरातील नायरा पेट्रोल पंप परिसर, दुकानांची पट्टी, तसेच वसाहती आणि लेआउट याठिकाणी जाण्यासाठी कोणताही संपर्क रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले असून, विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यांवर साचणारे पाणी, चिखल आणि उघड्यावर गुरे चरणे – हे चित्र गंभीर अपघाताला आमंत्रण देणारे आहे.
सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच घटक यामुळे त्रस्त आहेत. अपघात टाळण्याचा मार्ग नागरिकांकडे नाही, कारण शासनाने आणि ठेकेदार कंपनीने लोकसुविधांचा विचारच केलेला नाही.
विशेष म्हणजे, आधीच एका बाजूने जीआर इन्फ्रा कंपनीने नाली तयार केलेली असूनदेखील, त्याच ठिकाणी केवळ सहा फुटांच्या अंतरावर नगर परिषदेकडून दुसरी नाली बांधली जात आहे. यावरून दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आणि निधी खर्ची टाकण्याची शंका उपस्थित होते. ही बाब तातडीने उच्चस्तरीय चौकशीस पात्र ठरते. गडचांदूरमधील नागरिकांनी वारंवार प्रशासन व लोकप्रतिनिधींना या संदर्भात जागृत केले आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. हायवे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न विचारायचे धाडस कुणी करत नसल्याचे चित्र आहे. सध्या शेडमाके चौक ते अभिनंदन बारपर्यंतचे स्थानिक रस्ते महामार्गाशी जोडले गेलेले नाहीत. त्यामुळे लोकांनी शासन दरबारी जोरदार मागणी केली आहे की – या नियोजनशून्य कामांची तत्काळ चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सर्व शासकीय यंत्रणांनी एकजुटीने कामाला लागावे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे काम तातडीने पूर्ण झाले पाहिजे, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासन व संबंधित ठेकेदार कंपनीवर राहील, असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. शासनाने लक्ष घालून गडचांदूरच्या या गंभीर समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी, हीच जनतेची एकमुखी मागणी आहे.


COMMENTS