तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र) :– गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे राजुरा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, धान, तूर, भाजीपाला तसेच फळबागांची उभी पिके वाहून गेली असून नदी–नाल्यालगतची शेती खरवळून गेल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे पिके कुजली असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारामार्फत निवेदन सादर करून, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. लांडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. अवकाळी पावसामुळे शेती करण्यायोग्य जमीनही उद्ध्वस्त झालेली असल्याने त्वरित मदत न मिळाल्यास शेतकरी मोठ्या संकटात सापडतील.
या मागणीस पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते शंकर गोनेलवार, माजी नगरसेवक हरजीतसिंग संधू, आनंद दासरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष इंदूरवार, अनुसूचित जाती विभाग काँग्रेस तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष इशाद शेख, माजी प. स. सदस्य तुकाराम माणूसमारे, अभिजीत धोटे, धनराज चिंचोलकर, मधुकर झाडे, रणजीत पिंपळकर, कवडू सातपुते, वामन वाटेकर, संजू कुडमेथे, हेमंत झाडे यांसह विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS