विधानसभा निवडणुकीत बौद्धांची भूमिका – माझी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे

HomeNewsनागपुर डिवीजन

विधानसभा निवडणुकीत बौद्धांची भूमिका – माझी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – 2024 ची विधानसभेची निवडणूक ही अत्यंत निर्णायक निवडणूक आहे. सध्या भाजप प्रणित महायुती सरकारच्या काळात नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, जि प च्या शाळा खाजगी लोकांच्या घशात टाकण्याचा निर्णय, सामाजिक न्याय विभागाची निधी दुसरीकडे वळवण्याचा कारस्थान, शिक्षणात मनुवाद आणून मनुवादी व्यवस्था निर्माण करण्याचा षडयंत्र, आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणात वर्गीकरण करण्याचा भाजप प्रणित महायुती सरकारने तयार केलेली कमिटी ह्या निर्णयामुळे बौद्धांचेच नाही तर अनुसूचित जमाती व ओबीसी ह्या सगळ्यांचाच आरक्षण धोक्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक अधिकार काढून पुन्हा मनुवाद्यांचे गुलाम बनवण्याचे षडयंत्र भाजप प्रणित महायुती सरकारने सुरू केले आहेत.
     वरील सर्व षडयंत्राचा मुकाबला करण्यासाठी सर्व बौद्धांची एकजूट होणे ही काळाची गरज आहे. जोपर्यंत खरा आंबेडकरवादी प्रतिनिधी विधानसभेत जाणार नाही तोपर्यंत ह्या प्रश्नांवर संघर्ष होणार नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरवादी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी ह्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा ने खूप प्रयत्न केले. सर्वच आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांची भेट घेतली व त्यांना एकत्रित येऊन निवडणूक लढवावे अशी विनंती केली. मात्र वंचित ने व बहुजन समाज पक्षाने ह्या एकीला ठुकरावून लावले. एडवोकेट सुरेश माने, आनंदराज आंबेडकर व वामन मेश्राम हे एकत्र आले मात्र आघाडीच्या नावावरून मतभेद झाल्याने वामन मेश्राम सभेतून निघून गेले. आनंदराज आंबेडकर, सुरेश माने व प्रकाश शेडगे यांनी आरक्षणवादी आघाडी तयार करून राज्यातील 288 जागा लढवू अशा प्रकारची पत्रकार परिषदेद्वारा घोषणा केली. मात्र ह्या आघाडीतून दुसऱ्याच्या दिवशी आनंदराज आंबेडकर बाहेर पडले. व जरांग पाटील यांच्या आघाडीत आनंदराज आंबेडकर व राजरत्न आंबेडकर सामील झाले. ती आघाडी सुद्धा दोन दिवसातच तुटली. आणि आता तर एकाच मतदारसंघात वंचित, बीएसपी, माने, आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर व अन्य आंबेडकरवादी पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. यांची लढाई ही निवडून येण्याची नसून कोणत्या गटाच्या उमेदवाराला अधिक मते मिळतात यासाठीच आहे. यामुळे बौद्धांच्या मतांची विभागणी होऊन याचा सरळ सरळ फायदा मनवादी ताकतीलाच होणार आहे.
      खरंतर महायुती व महाविकास आघाडीला पर्याय म्हणून सर्व आंबेडकरवादी पक्ष एकत्र येऊन एकीकरणाची मोट बांधण्याची नितांत गरज होती. मात्र आंबेडकरवादी नेते एकमेकांचे तोंड देखील पाहण्यास तयार नाहीत. काही लोक रक्ताला साथ द्या म्हणून इतरांना धमकावीत असतात. ते रक्त तरी एकत्रित आहे का? (प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर) हा रक्त जरी एकत्र आला तरी सारा समाज त्यांच्या पाठीशी जाण्यास तयार आहे. मात्र रक्तही एकत्र येण्यास तयार नाही. ह्या नेत्यांना समाजाशी व समाजाच्या समस्येची काहीही घेणेदेणे नाही. केवळ यांना त्यांच्या राजकीय दुकानदार या चालवायच्या आहेत. यात समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची नितांत गरज आहे. कारण यांच्या फुटीरवादीमुळे सरळ सरळ मनुवाद्यांचा फायदा होत आहे. जी मनुवादी ताकत दलितांना दिल्या गेलेले संविधानिक अधिकार संपविणेच्या मागे लागले आहे. एवढेच नव्हे तर संविधानालाच बदलविण्याचे षडयंत्ररचित आहेत.
      अशावेळी बौद्धांचे प्रथम कर्तव्य हे आहे की, जी विचारधारा बौद्धांचे अधिकार संपवून संविधानाला धोका निर्माण करीत आहेत. संविधानाने दिलेले आरक्षण संपवित आहेत. अशा विचारधारेला हद्दपार करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आणि जे ह्या विचारधारेचा पराभव करू शकेल अशा विचारधारेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे.
   तसेही बौद्ध समाज हा वैचारिक दृष्ट्या प्रगल्ब आहे. तो योग्य निर्णय घेईलच यात मुळीच शंका नाही.

COMMENTS