७ गणेश मंडळांवर दाखल गुन्हे मागे घ्या; अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ – सुरज ठाकरे

HomeNewsनागपुर डिवीजन

७ गणेश मंडळांवर दाखल गुन्हे मागे घ्या; अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ – सुरज ठाकरे

पत्रकार परिषदेतून पोलीस प्रशासनाला इशारा.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :– राजुरा येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत ७ गणेश मंडळांनी रात्री १० नंतर साऊंड सिस्टीम वाजविल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेऊन न्यायलयीन लढा देऊ, असा इशारा काँग्रेसचे कामगार नेते तथा जयभवानी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी दिला आहे. ते राजुरा तालुका पत्रकार संघाचे कार्यालय, राजुरा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांचे सोबत उमेश गोरे, भुषण बानकर, रतन पचारे, अँड. चंद्रशेखर चांदेकर यासह ज्यां गणेश मंडळांवर गुन्हे दाखल झाले त्या सर्व सातही मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
      

दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी राजुरा शहरात मुख्य सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडत असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीवर्धक बंद ठेवणे बंधनकारक होते. मात्र, बालवीर गणेश मंडळ, शिवपुत्र गणेश मंडळ, श्री साई समाज गणेश मंडळ (राजीव गांधी चौक), नेहरू चौक गणेश मंडळ, राणा वार्ड गणेश मंडळ, भारत चौक गणेश मंडळ व महाराजा गणेश मंडळ (उईके राजुरा) या मंडळांनी नियमांचे उल्लंघन करून रात्री ११.१५ वाजेपर्यंत साऊंड सुरू ठेवला. या प्रकरणी पोलिसांनी मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांवर कलम २२३ बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचा तीव्र विरोध करत सुरज ठाकरे यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे अन्यायकारक असून, मंडळांचे कार्यकर्ते गुन्हेगार नाहीत. गुन्हे तातडीने मागे घेतले नाहीत तर आम्ही न्यायालयीन लढा उभारू.
      ते पुढे म्हणाले की, इतक्या वर्षात कधी कधी आणि कुठे कुठे गणेश विसर्जन, नवरात्रोत्सव, गर्भा – दांडीया आणि कुठे कसे कसे रात्री उशिरापर्यंत डिजे वाजले आणि याच पोलीस विभागाने त्यांच्यावर का कार्यवाही केली नाही याचे सगळे पुरावे आहेत तेही आम्ही न्यायालयात मांडू आणि मग सर्वांवरच कार्यवाही करण्यास भाग पाडू असे सुध्दा त्यांनी सांगितले.
   एकंदरीत  स्थानिक गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणी तोडगा न निघाल्यास लवकरच व्यापक आंदोलनाची भूमिका घेतली जाणार असल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page