गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :– राजुरा तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त कळमना गावाने पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या उपक्रमामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. पर्यावरणपूरक आणि सामाजिक जाणीवेचे प्रतिक ठरलेल्या या गावात रक्षाबंधनाचा सण यंदा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून कळमन्यातील ऑक्सीजन पार्क येथे गावकऱ्यांनी भगवान शिवाच्या मूर्तीला राखी बांधून भाविकतेने रक्षाबंधन साजरे केले. याचबरोबर पार्कमध्ये असलेल्या नारळ, चिकू, फणस, लिंबू, मोसंबी आदी फळझाडांनाही राख्या बांधण्यात आल्या. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” ही भावना जोपासत, निसर्गाशी नाते घट्ट करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी सरपंच नंदकिशोर वाढई म्हणाले, “रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण आहे. या सणाद्वारे आपण निसर्गाशीही बांधिलकी जोपासली तर सामाजिक एकात्मता वाढेल, दुरावा कधीच निर्माण होणार नाही. हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.”
या उपक्रमावेळी सरपंच नंदकिशोर वाढई यांच्यासह महादेव ताजणे (अध्यक्ष, गुरुदेव सेवा मंडळ), सुरेश गौरकार, विठ्ठलराव वाढई, कवडु पाटील मुठलकर, मदन वाढई, अमोल कावळे, योगराज वाढरे, विठ्ठल विदे, श्रीकांत कुकुडे, सुमीत वाढई तसेच ज्येष्ठ महिला गयाबाई ताजणे, शकुंतला पिंगे, गिरीजाबाई वाढई, कुदाबाई बल्की, सुमनबाई आसवले, सगीता ताजणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



COMMENTS