राष्ट्रीय प्रबोधनकार मनोजदादा कोटांगले : आंबेडकरी प्रबोधन चळवळीचा वैदर्भीय लोकविद्यापीठ !

HomeNewsनागपुर डिवीजन

राष्ट्रीय प्रबोधनकार मनोजदादा कोटांगले : आंबेडकरी प्रबोधन चळवळीचा वैदर्भीय लोकविद्यापीठ !

“गौतम नगरी चौफेर (श्नीकृष्ण देशभ्रतार) – मनुवादाने मांडला इथे वर्णव्यवस्थेचा झिणका…
मोडल्या तयाने कळ्या कम्बर कुबडं आणि मणका…
जातीवादाने केले चिथरपिथर राव केले रंका …
उठा ! पेटूनी प्रल्हाद- मनोजा देऊ ऐकीचा दणका…”

              जीवनसंघर्षाच्या अंगोपांगावरील घावांशिवाय परिवर्तन , प्रबोधन शक्य नाही; व्यवस्थाबाह्य उपेक्षित वर्गाच्या न्याय्यहक्काची नैसर्गिक लढाई आणि या लढाईसाठी तात्त्वज्ञानिक प्राणवायुची रसद पुरविणाऱ्या तमाम  महानायक-नायिकांच्या कार्यकर्तृत्त्वाच्या वैचारिक छावणीत स्वतः चे युद्धकौशल्य पणाला लावणे, तशी जाज्ज्वल्यता अंगी बाणवणे हे सम्यक समाजक्रांतीचे असिधाराव्रत भल्याभल्यांना पेलता पेलवत नाही. अशात प्राणांतिक संविधाननिष्ठा आणि ‘बुद्ध – अशोक – कबीर – शिवाजी – फुले – शाहू – आंबेडकर – कांशीराम ‘ या अष्टाध्यायी तत्त्वप्रणालीने अंकीत असलेल्या आंबेडकरी गायनादि-प्रबोधन चळवळीची पराकाष्ठा हे अंतिम जीवनध्येय असलेला राष्ट्रीय प्रबोधनकार, आंबेडकरी लोकगायक, संविधाननिष्ठेचा लोककवी, लाक्षणिक अर्थाने महालोककवी वामनादादा कर्डकांच्या शब्दातील,  महाराष्ट्रीयन-वैदर्भीय- एकोडी- साकोलीच्या मातीतला “तुफानातील दिवा” म्हणजे हरहुन्नरी लोककलावंत, प्रबोधनाचा अष्टोप्रहरी जागल्या  म्हणजे साक्षात मनोजदादा कोटांगले !
         मनोजदादा… आज आपल्यात नाहीत. असं, अकस्मात मनोजदादाचं इहलोकांतून एक्झिट होणं म्हणजे संगीत – साहित्य, कवी, लोककलावंत, सिनेनाट्यसृष्टी तथा आंबेडकरी प्रबोधन चळवळविश्व पोरकं होणं होय. या समग्र कार्यक्षेत्रातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कलावंतांना जोडणारा नैशनल हायवे हा मनोजदादांच्या कर्मसाधनेने जन्मभूमी एकोडीवरून जातो; याची अंतर्बाह्य जाणिव, प्रचिती आणि प्रतिनुभूती सहवासलभ्य लहानथोर कवी,कलावंत,प्रबोधक विभूतींना आहे. साकोली तालुक्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रथितयशी असलेल्या एकोडी गावचे मनोजदादा या महाकलंदर कलावैभवाने बरीच माणसे कमावली;  होय…‌ कारण , हा माणूस ! मंचावरून, रस्त्यावरून त्याच्या फरड्या आवाजात प्रबोधत असताना , गात असताना आपल्या विशिष्ट शैलीत जुल्फे उडवित क्रांतमनस्क माणसे अंतर्मनाने जोडत असे … त्याच्या मैत्रवर्तुळात तुटलेली, पिचलेली अगतिक माणसे मिठीगोंजाराने शिवत असे… सांधत असे… मानव्याचा सातत्यशील बेमालूम जागर करत प्रेम, मैत्री, विश्वास, निष्ठा आणि आपुलकीची दुनियादारी निर्माण करणारा  शांत, संयमी, समन्वयीं प्रयोगशील सामाजिक अभियंता म्हणून मनोजदादांचे जीवनकर्तृत्त्व  सिद्ध पावले आहे.

“संघर्ष बा भीमाचा तू ध्यानी जरा घे …
जागवाया गावोगाव मशाल क्रांतीची घे …
मैदानी येऊनी डरकाळी वाघाची अशी दे …
रे भीमवीरा… आ…आ… वैऱ्याला घाम फुटू दे…”
         
           असा क्रांतीसाठी आवाहन करत मनोजदादा प्रबोधनाच्या मुलूखमैदानी लोकव्यवहारांत गर्जत होता. समाजकारण, राजकारण, धर्म, शिक्षण, बहिष्कृतांचे अर्थकारण, बेकारांचे जथ्यें , शिक्षितांची हतबलता, लोकशाहीविषयक चिंतन, संविधाननिष्ठा, बहुजनादि शेतकरी-कामगार-विद्यार्थी-आदिवासी वर्गाच्या प्रश्नांना आपल्या ‘प्राबोधिक- गीत’ संसदेत मांडणारा… आंदोलने,मोर्चे,धरणे काढत सर्वकष समाजकल्याणार्थ ‘काम्रेड – पैंथर’ सारखा व्यवस्थेविरोधात कायम रस्त्यावरील बुलंद आवाज म्हणजे मनोजदादा हा खरा भारतीय संविधानांकीत लोकसंस्कृतीशी इमान राखणारा वैदर्भीय सच्चा लोककलावंत , लोकविद्यापीठ आणि राष्ट्रीय प्रबोधनकार होय. आयुष्याच्या विद्यार्थी – युवावस्थेपासून अंतिम समयापर्यंत आंदोलन, चळवळ, सभा, संमेलने, कार्यशाळा, गीतगायन, अभिनय, प्रबोधन, उद् बोधन , धम्म परिषदा, भीम मेळावे, जलसे, परिवर्तनशील कव्वाली , तबला-हार्मोनियम वादन , सिनेनाट्याभिनय , आंबेडकरी चळवळीचे गीतलेखन तथा गायन ह्या पसाऱ्यात मनोजदादांचे मन निरंतर वावरत होते. क्रांतकलासक्तता हा त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा वैविध्यपूर्ण विशेष आहे. महाबोधी महाबुद्धविहाराच्या मुक्तीच्या जागतिक महाआंदोलनाच्या सुरात सुर मिसळत , आपल्या प्रज्ञाप्रतिभाबलाने मनोजदादा लिहत होता… गात होता…
” हमे भीक ना तुम्हारी
          अधिकार चाहिए …   
हमको  तो  महाबोधी
         बुद्धविहार चाहिए… “

           कवी, गीतकार , संगीतकार, प्रबोधकार,सिनेनाट्यभिनेता म्हणून मनोजदादांच्या हरहुन्नरीपणाला , सायुज्यशील प्रज्ञाप्रतिभेचे युगसंवादी आकलन स्वतंत्रपणे करून घेण्याची नितांत सांस्कृतिक अनिवार्यता अगदी स्पष्ट आहे. आंबेडकरी गायन चळवळीतील राष्ट्रीय महाप्रबोधनकार  प्रकाशनाथ पाटणकर ह्यांना मनोजदांनी गुरू मानले. बहुजन मिशनरी कवी के. पाटील , गीतकार प्रल्हाद खोब्रागडेंची बरीच गाणे त्यांनी गायली. अनेक स्वलिखीत गीतांना स्वरसाजासह संगीतबद्धही केले. ‘ जाग रे बहुजना ‘ ही ध्वनीफीत, जानी मेश्राम दिग्दर्शित ‘दे दान सुटे गिऱ्हाणं’ या दूरदर्शनवरील लघुचित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेनाट्यभिनेते महेन्द्र गोंडाणे यांच्या सह  मनोजदादांची भूमिका अजरामर ठरली. इंजि. मोरेश्वर मेश्राम दिग्दर्शित ‘ ३१डिसेंबर ‘ , ‘ रे ला रे ..’ या पूर्ण लांबीच्या मराठी सिनेमांमध्ये सिनेनाट्याभिनेते, कवी, नाटककार प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांच्या जोडीने मनोजदाने अभिनय केले आहे. मनोजदांचे गुरूबंधूतुल्य , राष्ट्रीय  महाप्रबोधनकार अनिरूध्द शेवाळे , तू स्वरांची अंजली ‘ या प्रेमगीतांच्या अल्बम मध्ये माझी ‘ तू रानाची मैना…’  आणि ‘ पाखरा तुझी व्यथा ‘ ही दोन गाणीं आणि माझे सुहृदय कविमित्र शिवकुमार बन्सोड लिखीत ‘ लपे चांदणी ढगात ‘ हे गाणं भंडारा, गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली या  झाडीसृष्टीत  गायक म्हणून गाजवलं ते मनोजदांनीच! शेकडो मराठी झाडी रंगभूमीवरील नाटकांमध्ये दिग्दर्शन  अभिनय – पार्श्वगायन तथा वादनाने आपल्या कलागुणांच्या भूरळीची, अभिरूचीसंपन्नतेची जाणकार रसिक श्रोते-प्रेक्षकांच्या  चित्तभूमीवर कायम लेणी कोरली आहे. राष्ट्रीय प्रबोधनकार मैत्रवर्गसमुदाय (  प्रकाशनाथ पाटणकर ,अनिरूध्द शेवाळे, अंजली भारती, सुभाष कोठारे, मनोजराजा, परमानंद भारती, विकासराजा, प्रशांत नारनवरे, संविधान मनोहरे, भीमेश भारती, भावेश कोटांगले, लता किरण, सुनिता सरगम , तनुजा नागदेवे, गीता गोंडाणे, संविधान भारती, क्रांती मिनल , अश्विनी खोब्रागडे … या आणि अन्य अशा बऱ्याच मान्यवरांची नावे कालमर्यादेमुळे सुटत आहेत… सबब क्षमस्व ! ) मनोजदांना साश्रूनयनांनी मनोमन गायनभावदग्ध आदरांजली वाहिली आहे. त्यातून मनोजदादांच्या क्रांतप्रवणशील सकला-सांगितीक दुनियेचा बाज,साज आणि काज गौरवान्कीत झालेला आहे.

            तर सामाजिक – सांस्कृतिक – राजकीय – प्रशासकीय तथा  शैक्षणिक क्षेत्रातील अनुक्रमे भाई परमानंद मेश्राम , गुरूवर्य  वाय. आर.  मेश्राम सर ,   प्रकाशनाथजी पाटणकर  , अनिरूध्दजी शेवाळे , अंजली भारती,  सुभाष कोठारे, सुभाष मानवटकर,  दिलीपजी मोटघरे , डा. संघरत्नेजी , डा. महेन्द्र गणवीर , डा. विक्रांत भवसागर, डा.गजेन्द्र गजभिये, अविनाश  ब्राम्हणकर,  प्रा. डा. शंकर बागडे, प्रा. डा. सुरेश खोब्रागडे ,  कैलासभाऊ गेडाम, अड. सुरेश रामटेके, संजय केवट, डा. सोमदत्त करंजेकर, अचल मेश्राम, प्रियाताई शाहारे, माहेश्वरी नेवारे, रमेश खेडीकर , शिलकुमार वैद्य सर , प्रा. राहूल मेश्राम, प्रा. जनार्दन मेश्राम , महेशजी वासनिक, नरेन्द्र मेश्राम, छोटू बोरकर , तीर्थानंद बोरकर, डी. जी. रंगारी , शिवकुमार बन्सोड, प्रा. राहूल तागडे  (शोक सभा निवेदक ) , काम्रेड शिवकुमार गणवीर ( शोक सभाध्यक्ष ) या तमाम बंधूतुल्य सहकारी-मित्र मंडळी, मार्गदर्शक – गुरूवर्य मंडळी आणि ग्रामस्थांनी मनोजदादांप्रती आदरांजली स्वरूप केलेल्या विचाराभिवादनाने स्मशानभूमीवरील शोकसभेचे तत्कालीन पर्यावरण केवळ अनुपम  ‘मनोजभावा’ने  अधिक दु:खार्त … अधिक गहिरा झालाय… हा गहिवरभाव फार वेदनादायी, प्रेरणादायी  आणि हृदयदावक असाच म्हणावा लागेल ; या शोकसंवेदनांद्वारे  मनोजदादांच्या एकूणच क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाची   गर्तता आणि  उत्तुंगता दृग्गोचर होते आहे.
            मनोजदादा कोटांगले यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर दु:खाचं महाडोंगर कोसळलं आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी अर्थातच आमच्या आदरणीय वहिनीसाहेब , मुले, आई-वडील , भावंडे सारेच प्रचंड शोकदग्ध आहेत. वैदर्भीय आंबेडकरी  चळवळीच्या मनोजदादांच्या रूपातील इहवादी लौकिकांस, कोहिनूरांस आपण सगळे सदाकदाचे अंतरले आहोत. परंतू, आपण सारे आपले जीवनध्येय , संविधाननिष्ठा न विसरता या सम्यक क्रांतिपथावरून एल्गारत राहिलो पाहिजे अशा आदर्श वस्तुपाठाची शिकवणच मनोजदादा त्यांच्या शब्दात किती उद्बोधकपणे देऊन जाताहेत ,

“उज्ज्वल भविष्याची जाणीव माणसा झाली पाहिजे…
उद्याची तयारी मित्रांनो आपण आजचं केली पाहिजे…
प्रबोधन करताना वाचन  मनन गरजेचं आहे मनोजा …
सर्व भारतीयांनी संविधानाचं अभिवाचन केलं पाहिजे… ”
हे सारं शब्दातीत म्हणावे लागेल.
       अलविदा … माय डियर ब्रो मनोजदा … तू आमची पुण्यशील स्मरणप्रेरणा आहेस … तुझ्या  विचारकार्यकर्तृत्त्वाप्रती सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो… !

तुझ्या भावस्मृतीस …
क्रांतिकारी , सप्रेम  जय भीम … !
नमो बुद्धाय … !!

               लेखक
    ✍🏻 प्रा राहूल तागडे ✍🏻

                                  संकलन
                          श्रीकृष्ण देशभ्रतार
                            (समाजसेवक)

COMMENTS

You cannot copy content of this page