खाणीकर्म विभाग चिडीचूप ❗.
गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा) – सध्या तालुक्यात रेतीची चोरटी वाहतूक जोमात सुरू आहे. लगतच्या तालुक्यात स्टॉक केलेली रेती विना परवान्याचे येत आहे. बिनदिक्कतपणे उथळ मानेने रेती चोरीचा गोरखधंदा सुरू असल्याने शहरात रेतीचे उंचच उंच ढिगारे पहायला मिळत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल चोरीला जात असताना खाणीकर्म विभाग मात्र झोपेत असल्याने संशय बळावला आहे.त्यातच एरव्ही ट्रॅक्टर रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी धावाधाव करणारे कर्मचारी आता मात्र हिंमत दाखवत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अधिकाऱ्यांच्या नाकावर लिंबू पिडून चोरटी वाहतूक होत असल्याने अखेर या विनापरवाना रेतीचे ‘ पाठीराखे’ कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. …..सध्या तालुक्यात व शहरात विविध बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरात नगर परिषद अंतर्गत रस्ते, नाल्या, रापट व घरकुल चे काम युद्धपातळीवर सुरू आहे व दुसरीकडे ग्रामीण भागात ग्राम पंचायत, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुध्दा अनेक कामे प्रगतीपथावर आहे. मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असताना रेतीच्या तुटवड्यामुळे कामात अडथळे निर्माण होत आहे. मात्र सध्या शहरासह तालुक्यात रेतीची आवक वाढली आहे. लगतच्या गोंडपिपरी व पोभुर्णां तालुक्यातून रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. आज घडीला थेरगाव शिवारात रेतीचा मोठा साठा असल्याची माहिती आहे. दररोज पहाटेला ८-१० हायवाने रेती येत आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र रेतीचे उंचच उंच ढिगारे पहायला मिळत आहे. ग्रामीण भागात देखील रेतीचा अविरतपणे पुरवठा केला जात आहे. या चोरट्या रेतीची विल्हेवाट लावण्यासाठी कमिशनवर काही दलाल काम करीत असल्याची चर्चा आहे. सध्या या रेतीच्या वाहतुकीला कोणताही परवाना नाही हे चुनाळा गावात केलेल्या कारवाई वरुन अधोरेखित होत आहे. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी आवक वाढली असताना खाणीकर्म विभाग मात्र कार्यालयात बसून कर्तव्य बजावत असल्याने संशय बळावला आहे. आजतागत या विभागाने चोरट्या रेतीवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यांचा हाच दुर्लक्षितपणा रेती व्यावसायिकांच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे या चोरट्या वाहतुकीचे पाठीराखे कोण असा प्रश्न विचारला जात आहे. मुळात या हायवा व्यावसायिकांना खुली सूट दिली जात असल्याने दिवसागणिक त्यांची मुजोरी वाढत चालली आहे. लाखोचा महसूल बुडत असताना प्रशासन मात्र गप्प बसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ….कोट… ट्रॅक्टर तस्करांवर कारवाई करणारे आता हायवा वर मेहेरबान ….. एरव्ही ट्रॅक्टर मधून रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच महसूल कर्मचारी तडकाफडकी कारवाई साठी सज्ज होत असतात. मात्र तालुक्यात मागील काही महिन्यापासून बाहेर तालुक्यातून रेतीची बिनदिक्कतपणे वाहतूक केली जात असताना प्रशासन मात्र मुंग गिळून गप्प बसल्याने अखेर त्यांची चुप्पी संदेह निर्माण करणारी ठरत आहे. कर्मचाऱ्यांच्या या दुपट्टी भूमिकेने ट्रॅक्टर तस्कर चांगलेच कोंडीत अडकले आहे.


COMMENTS