– समाजकल्याण पोर्टलवर सुधारणा करण्याची गरज.
गौतम नगरी चौफेर // राजुरा ४ जुलै गुणवंत विद्यार्थी असूनही फ्रीशिप योजनेपासून एका विद्यार्थ्याला वंचित ठेवण्यात आले आहे. शासनाच्या समाजकल्याण पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे व नियमांच्या गैरलागू अटीमुळे सार्थक सर्वानंद वाघमारे या विद्यार्थ्याला शैक्षणिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
सार्थक वाघमारे रा. बामणवाडा पोस्ट चुनाळा ता. राजूरा हा विद्यार्थी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर येथे B.A.M.S. (रेग्युलर) शिक्षण घेत होता. दरम्यान त्याने NEET 2024 ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे MBBS प्रथम वर्षात प्रवेश घेतला.
BAMS सोडून MBBS ला प्रवेश घेतल्याने त्याने BAMS साठी शासनाकडून मिळालेली फ्रीशिपची रक्कम जवळपास तीन लाख रुपये शासनाच्या चलनाद्वारे परत केली आहे. ही कृती शासननिष्ठा व पारदर्शकतेचा आदर्श आहे. मात्र आता एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी फ्रीशिपचा अर्ज भरताना समाजकल्याण पोर्टलवर फॉर्म अपलोड होत नाही. कारण पोर्टलवरील प्रणाली बी.ए.एम.एस. सोडून एम.बी.बी.एस. मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या सक्षम नाही. या तांत्रिक अडथळ्यामुळे फ्रीशिपची सवलत न मिळाल्याने संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना प्रत्येकी लाखो रुपयांची ट्यूशन फी स्वतः भरावी लागत आहे. जी सामान्य कुटुंबासाठी अत्यंत कठीण गोष्ट आहे. शासनाच्या ‘शिक्षण सर्वांसाठी’ या धोरणाला हा तांत्रिक अडथळा आणि प्रशासनाचा ढिसाळपणा काळिमा फासणारा आहे. समाजकल्याण विभागाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन पोर्टलमध्ये सुधारणा करावी. जेणेकरून सार्थक वाघमारे सारखा इतर कोणीही गरीब व गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणापासून फक्त तांत्रिक कारणामुळे वंचित राहणार नाही. असाच सर्वत्र प्रकार अभ्यासक्रम बदललेल्या राज्यातील विद्यार्थ्यांबाबतचा आहे. त्यामुळे यावर शासन स्तरावर विशेष सुधारणा होणे आवश्यक आहे. विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करून शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी बामनवाडा ग्राम पंचायत चे माजी सरपंच सर्वानंद वाघमारे यांनी केली आहे.
COMMENTS