गौतम नगरी चौफेर //बादल बेले राजुरा 23 जुन
ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा व्दारा संचालित ॲड यादवराव धोटे महाविद्यालयात 11 वे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन आज सकाळी ६ ते ७ या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. सदर उपक्रम आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार तसेच पतंजली योग समिती, राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केल्यापासून जागतिक स्तरावर योगप्रशिक्षणास व योगसाधनेला नवे वलय प्राप्त झाले आहे. यावर्षी भारत सरकारने दिलेली संकल्पना “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” ही जनमानसात आरोग्यप्रती जागृती निर्माण करणारी ठरली आहे. बदलत्या जीवनशैलीच्या अनुषंगाने शरीर व मनाच्या समतोलासाठी योगशास्त्र एक सशक्त साधन ठरते. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक उत्कर्षासाठी योगाची भूमिका अतुलनीय आहे.
कार्यक्रमामध्ये पतंजली योग समितीचे प्रवीण प्रशिक्षक प्रभाकर चन्ने,अशोक पिंपळकर व ललिता पिंपळकर यांनी मार्गदर्शनपर योगप्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांना योगाचे तंत्र, तत्वज्ञान व उपयुक्तता यांचे मार्मिक विवेचन केले व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, एकवृक्ष देऊन स्वागत व सत्कार केला एक तास चाललेल्या या सत्रात योगासनांची शुद्धता, प्राणायामाची शैली आणि ध्यानधारणाचे सादरीकरण घेण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, तसेच पर्यवेक्षक व विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा. धनंजय डवरे यांनी केले. हा योगदिन उत्सव उपस्थितांना नवचैतन्य व आरोग्यविषयक साक्षरतेचा नवा संदेश देणारा ठरला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली.



COMMENTS