HomeNewsनागपुर डिवीजन

नगर परिषद गडचांदूरचा भोंगळ कारभार!

स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष –
आरोग्य विभागाचा गाफीलपणा चव्हाट्यावर

गौतम नगरी चौफेर //विनोद खंडाळे गडचांदूर (प्रतिनिधी) – गडचांदूर शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला असून, नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः डोह ले-आउट परिसरात सध्या प्रचंड घाण, कचरा, दुर्गंधी व आरोग्य धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात आजही कचरा कुंड्यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने येथील नागरिक अक्षरशः वाटेल त्या ठिकाणी – रस्त्याच्या कडेला, प्लॉटवर, इमारतींच्या मागे – कचरा टाकण्यास भाग पाडले जात आहेत.

या सर्व प्रकारामुळे संपूर्ण परिसरात घाणेरड्या वातावरणात माशा, डास, व भटक्या जनावरांचा उपद्रव वाढला असून, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका वाढत चालला आहे. स्थानिक रहिवाशांनी वारंवार नगर परिषदेकडे तक्रारी करूनही त्यांच्या विनंत्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही ठिकाणी तर रहिवाशांनी स्वतःहून साफसफाई करण्यास सुरुवात केली असून, प्रशासनाला जाब विचारला जात आहे.

डोह ले-आउटसह इतर वॉर्डांमध्ये सुद्धा कचऱ्याचे ढीग उभे राहत असून, सार्वजनिक ठिकाणे – जसे की बाजारपेठ, बसस्थानकाजवळील रस्ते, शाळांसमोरील भाग – याठिकाणी देखील नियमित स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. आरोग्य विभागाचे कर्मचारी केवळ कागदोपत्री स्वच्छता करत असल्याचे आरोप होत आहेत. काहीजण तर दिवसेंदिवस घाणीतून वाट काढत दैनंदिन व्यवहार करत आहेत.

गडचांदूर नगर परिषदेकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत कुठलाही प्रभावी उपक्रम राबवला जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अभियानाचा फलक लावून फोटोसेशन करून कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी संपवली आहे, पण खऱ्या अर्थाने जनतेला आवश्यक असलेली स्वच्छता व्यवस्था मात्र दुरापास्त आहे.

रहिवाशांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. “लवकरच कचरा कुंड्या लावण्यात येतील”, “स्वच्छता वाहन पाठवले जाईल”, अशा प्रकारचे उत्तर दिले जाते, पण प्रत्यक्षात ते फोल ठरत आहे.

शहरातील विविध सामाजिक संघटनांनी या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, जर तात्काळ स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिक व संघटनांनी संयुक्तरीत्या तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

एकीकडे देशभरात स्वच्छ भारताचे ध्येय गाठण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, पण गडचांदूर नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे हे ध्येय पूर्णपणे धोक्यात आले आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा येथील अस्वच्छता ही केवळ शहराची नव्हे, तर प्रशासनाच्या प्रतिष्ठेचीही लाजीरवाणी बाब ठरणार आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page