महावितरणचा घातक हलगर्जीपणा: रस्त्याऐवजी घरालगतून नेलेली 11 के.व्ही. लाईन घरावर कोसळली – परिसरात भीतीचे वातावरण

HomeNewsनागपुर डिवीजन

महावितरणचा घातक हलगर्जीपणा: रस्त्याऐवजी घरालगतून नेलेली 11 के.व्ही. लाईन घरावर कोसळली – परिसरात भीतीचे वातावरण

गौतम नगरी चौफेर विनोद खंडाळे प्रतिनिधी – गडचांदूर  गडचांदूर – शहरातील संदीप गोरे यांच्या घरावर महावितरण कंपनीने नेलेली 11 के.व्ही. उच्चदाब विद्युत वाहिनी आता थेट जीवावर बेतण्याच्या स्थितीत पोहचली आहे. आधीच ही लाईन नव्या हायवेवरून न नेता थेट घरालगतून आणि अत्यंत कमी उंचीवरून नेण्यात आली होती, आणि आता प्रत्यक्षात या घरावरच पोल कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या या प्रकरणामुळे संदीप गोरे यांचे कुटुंब अक्षरशः मृत्यूच्या सावटाखाली जगत आहे. पोल कोसळून घराच्या भागाला थेट धक्का बसल्याने मोठी दुर्घटना टळली ही केवळ सुदैवाची बाब. मात्र अजूनही ही धोकादायक लाईन घराच्या अगदी जवळून जात आहे आणि त्याची दुरुस्ती अथवा पुनर्व्यवस्था करण्यासाठी महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या धोकादायक निर्णयामुळे केवळ गोरे कुटुंब नव्हे, तर परिसरातील संपूर्ण नागरिक भयभीत झाले आहेत. वीज प्रवाह सुरू असताना या पोलमध्ये घर्षण किंवा शॉर्ट सर्किट झाल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येणार नाही.

विशेष म्हणजे, या लाईनसाठी सार्वजनिक रस्त्याचा वापर टाळून ती थेट रहिवासी घराच्या अगदी बाजूने नेण्यात आली होती. हे नियोजन नियमबाह्य व निष्काळजीपणाचे भयानक उदाहरण असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. याआधीही गोरे कुटुंबीयांनी वेळोवेळी लेखी व मौखिक तक्रारी महावितरणकडे दाखल केल्या होत्या, परंतु अद्याप यावर कोणतीही योग्य ती कारवाई झालेली नाही.

स्थानिक नागरिकांनी एकमुखाने यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधित लाईन तात्काळ दुसऱ्या सुरक्षित मार्गावर वळवावी किंवा ती अंडरग्राउंड करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणवर राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page