जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष उपसरपंचाची आक्रमक भूमिका
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी कोरपना) : जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेच्या कामासाठी गेल्या १ वर्षापासून गावातील रस्ते व भूमिगत गटारे फोडून ठेवल्याने गावातील नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी गुरुवारी कंत्राटदाराविरुद्ध गडचांदूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत बिबी गावात ५ कोटी ३७ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. ह्या कामाचे कंत्राट मनोज जगताप यांच्या तिरुपती कन्सट्रक्शन, बीड या कन्सट्रक्शन कंपनीला मिळाले आहे.
प्रत्येक कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यासाठी गावभर सिमेंट रस्ते व भूमिगत गटारे फोडून पाईप टाकली आहे. मात्र अंदाजपत्रकानुसार रस्ते व झालेले नुकसान जसेच्या तसे बनवून देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. गावातील लोकांना एक वर्षापासून ह्याचा त्रास होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र संबंधित काम ग्रामपंचायतीचे नसून ग्रामपंचायत इतका मोठा बोजा सहन करू शकत नाही.
कंत्राटदाराकडून फोडलेले काँक्रिट रस्ते व भूमिगत गटारे दुरुस्त करण्याचे काम दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. संबंधित कंत्राटदाराने काम सुरू करून गावातील अख्खे रस्ते फोडून ठेवले असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना २६ ऑगस्ट २०२४ ला तक्रार दाखल केली होती मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
गावातील वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत, तसेच साचणाऱ्या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कंत्राटदाराशी अनेक दिवसांपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून ते फोन उचलत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी यासाठी उपसरपंच आशिष देरकर यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली.
कंत्राटदार गावकऱ्यांना प्रतिसाद देत नसल्यामुळे पोलिसात धाव घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. कंत्राटदाराविरुद्ध तक्रार प्राप्त झाली असून चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
– शिवाजी कदम
पोलीस निरीक्षक, गडचांदूर
COMMENTS