गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) – ता. २७ : भाजपने राजुरा येथून देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे माजी आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्यामुळे धोटे, निमकर यांनी रविवारी (ता. २७) संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत भोंगळेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अॅड. संजय धोटे बंड करण्याच्या तयारीत आहेत. उद्या ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राजुरा विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी अॅड. संजय धोटे, देवराव भोंगडे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यात रस्सीखेच होती. काल भाजपने भोंगळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील धोटे, निमकर यांच्या कार्यकत्यांनी भोंगळेंच्या उमेदवारीला विरोध केला. कार्यकर्त्यांच्या भावना पत्रकार परिषदेतून धोटे, निमकर यांनी भाजपच्या वरिष्ठांना कळविल्या. यावेळी चारही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धोटे यांनी स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याची मागणी केली. अन्यथा कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले. यामुळे राजुरा विधानसभेतील भाजप सरळ दोन गटात विभागल्या गेली आहेत. या राजकीय भूकंपामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, भोंगळे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. विधानसभेची उमेदवारी बदलण्यासाठी व स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांची भेट घेणार असल्याचे धोटे, निमकर सांगितले.
यांनी भोंगळे यांनी स्थानिक वरिष्ठ नेत्यांना कार्यक्रमातून सतत डावलून कमी लेखण्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. भोंगळेंची उमेदवारी रद्द न झाल्यास धोटे यांचे बंडाचे आव्हान भाजपसमोर उभे ठाकणार आहे. समोरच्या रणनितीबाबत वेट अॅन्ड वॉच असा सूचक इशारा अॅड. संजय धोटे यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे, अरुण मस्की, सुरेश केंद्रे, अबिद अली, नीलेश ताजने यांची आदीची उपस्थितीत होती.
COMMENTS