गौतम नगरी चौफेर बादल बेले राजूरा – नगरपरिषद क्षेत्रातील किसान वार्ड क्रमांक १, देशपांडे वाडीतील नागरिकांना प्लॉट वर्गीकरणातील विसंगतीमुळे मोठा आर्थिक व कायदेशीर भुर्दंड सहन करावा लागत आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अकृषक परवानगीच्या आदेशानंतरही तत्कालीन तहसीलदारांनी वर्ग १ चे प्लॉट वर्ग २ मध्ये रूपांतरित केले. या निर्णयामुळे सुमारे २५० कुटुंबांना बांधकाम परवानगी, कर्जसुविधा व जमीन व्यवहारातील हक्कांपासून वंचित रहावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाच्या संदर्भात २२ सप्टेंबर रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या पुढाकारात विकास समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय ओबीसी आयोगाध्यक्ष हंसराज भय्या अहीर यांची WCL सभागृहात भेट घेऊन निवेदन सादर केले. यापूर्वीच २० सप्टेंबर रोजी अहीर यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चंद्रपूर येथे चर्चा करून या प्रश्नावर कार्यवाही करण्याचे निर्देश मिळवले होते.
बैठकीत उपस्थित असलेले एस.डी.ओ. रवींद्र माने व तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांना तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले. या चर्चेस माजी आमदार संजय धोटे, WCL चे मुख्य महाव्यवस्थापक इलियास हुसेन, अरुण मस्की, राजू घरोटे, चुनाळा सरपंच बाळनाथ वडस्कर, आयोगाचे खाजगी सचिव प्रशांत घरोटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. विकास समितीचे अध्यक्ष बळीराम खुजे, उपाध्यक्ष केवाराम डांगे, सचिव मधुकर सत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. अहीर यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रश्नावर राज्य शासनाचे लक्ष वेधले गेले असून लवकरच नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


COMMENTS