जायला रस्ताच नाही साहेब, आम्ही शाळेत कसे जायचे.

HomeNewsनागपुर डिवीजन

जायला रस्ताच नाही साहेब, आम्ही शाळेत कसे जायचे.

कवठाळा-आवाळपुर रस्त्यावरील पुल अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांचा प्रश्न

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी  बिबी) : कोरपना आदिवासी बहुल  तालुक्यातील कवठाळा येथून आवाळपुर या गावाला जोडणाऱ्या  ७  किमी रस्त्यावर खैरगाव गावाजवळील नाल्यावरील पुलाचे काम मागील 2 वर्षांपासून सुरू आहे. पुलाचे काम जवळपास पूर्णही झाले आहे. मात्र एका बाजूचा रस्त्याला जोडणारा रापटाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात मार्गक्रमण करता येत नाही. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना तथा विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
                 गावात इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने या माध्यमाच शिक्षण घेण्याकरिता या मुलांना खैरगाव गावावरून नांदाफाटा येथे शिक्षणासाठी जावे लागते. या विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला कुठलही वाहन रस्ता खराब असल्याने तयार होत नाही. त्यांना अर्धवट पुलिया पर्यंत पालकांच्या मदतीने पायदळ यावे लागते तिथून त्यांना दुसऱ्या वाहणाने पुढचा प्रवास करावा लागतो.


            सध्या पावसाळा असल्याने तात्पुरते सुरु असलेल्या रापटावरून चिखल व पाणी असल्याने गाडी काढणे कठीण व धोक्याचे आहे. पायदळ जाताना सुद्धा या जीव मुठीत घेऊनच या रापटाचा वापर करत पालकांना आपल्या मुलांना सोडावे लागते. आमच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे नाही का? असा प्रश्न गावकरी विचारत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तथा लोकप्रतिनिधी यांनी ही परिस्थिती गांभीर्याने घेऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी अपेक्षा पालक तथा गावकरी तथा या मार्गाने मार्गक्रमन करणारे नागरिक करीत आहे.

   “आम्ही नाल्यातून रस्ता काढत महत्वाच्या कामासाठी गावात जीव धोक्यात घालून जातो मात्र, आमच्या लहान लहान विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना मोरीच्या ठिकाणी आम्ही एक दोन पालक मुलांना एकमेकांच्या मदतीने उचलून देत मोठ्या कसरतीने आम्ही नाला पार करून देतो”- श्रीकांत बांगडे, खैरगांव


          “आम्हाला शाळेत जाण्यासाठी रापटावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. तर कधी कधी नाल्याला पूर आला तर सात ते आठ दिवस आम्ही शाळेतच जात नाही” – विद्यार्थी


“आम्ही काम सुरु केले जवळपास पूर्ण ही झाले मात्र अजूनही कामाचे देयक प्राप्त झाले नाही. त्यामुळे पुढील काम करण्यास आम्हाला आर्थिक अडचनींचा सामना करावा लागतो आहे.देयक प्राप्त झाल्यास त्वरित काम पूर्ण करू”- राहुल वरलानी, कंत्राटदार

COMMENTS