लालपरीचे डोळे म्हणजे  चालक, वाहक आणि सुरक्षित प्रवास होय:- प्राचार्य:- राहुल डोंगरे

HomeNewsनागपुर डिवीजन

लालपरीचे डोळे म्हणजे  चालक, वाहक आणि सुरक्षित प्रवास होय:- प्राचार्य:- राहुल डोंगरे

(तुमसर बस स्थानकात लालपरीच्या ७७ व्या वर्धापन दिन प्रसंगी प्रतिपादन)

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा– तुमसर बस स्थानक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या “लालपरी” अर्थात एस.टी. बसच्या ७७ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगारप्रमुख कन्हैया भोगे यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून प्राचार्य राहुल डोंगरे यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात बोलताना प्राचार्य राहुल डोंगरे यांनी “लालपरी”च्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “लालपरी ही फक्त लोखंडी बस नसून ग्रामीण भारताच्या स्वप्नांची वाहक आहे. तिचे डोळे म्हणजे चालक आणि वाहक – हेच खरे तिचे जीवंत हृदय आणि आत्मा आहेत. पावसात, वादळात, उन्हात आणि धुक्यातही आपली सेवा प्रामाणिकपणे बजावणारे हे दोघेच लालपरीचे खरे शिल्पकार आहेत.”

ते पुढे म्हणाले, “डिजिटल युगात कितीही प्रगती झाली तरी लालपरीचे माणसाशी असलेले नाते अजूनही अबाधित आहे. वेळेवर धावणारी, सर्वांनाच सामावून घेणारी ही बस म्हणजे आपल्या जीवनाची चिरसाथी आहे.” प्रवाशांना आवाहन करत त्यांनी सांगितले की, “शांत, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी लालपरी हा सर्वोत्तम पर्याय आहे.”

या प्रसंगी बस स्थानक व परिसर लालपरीच्या रंगात सजविण्यात आला होता. आकर्षक फुलांची सजावट ,सुंदर रांगोळी आणि देखणी रोषणाईने वातावरण प्रसन्न झाले होते. वर्धापन दिनानिमित्त खास केक कापण्यात आला. प्रवाशांना गुलाब पुष्प व मिठाई देवून सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी श्री कटरे विभागीय अभियंता,आकाश भागडकर कार्यशाळा अधिक्षक,प्रमोद बारई लेखापाल,सागर मलघाटे वाहतूक निरीक्षक,कपिल लांबट,ओंकार गौतम, कैन्हया रहांगडाले,संजय वानखेडे,निशिकांत मोटघरे,मनोज मोटघरे, रामप्रसाद पटले,सौ. रविता आडे,सौ.सविता पचारे ,सौ.सोनाली फुणे,गायत्री कावळे,पल्लवी जुनघरे,सीमा मेश्राम, पंचशीला उके यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन गजानन मोटघरे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक वाहतूक अधीक्षक रचना मस्करे यांनी मानले.

COMMENTS

You cannot copy content of this page