नरेंद्र भोंडेकरांच्या प्रचारासाठी ०७ नोव्हेंबर २०२४ ला मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे पवनीत

HomeNewsनागपुर डिवीजन

नरेंद्र भोंडेकरांच्या प्रचारासाठी ०७ नोव्हेंबर २०२४ ला मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे पवनीत

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७ नोव्हेंबर रोजी जिल्हयात येत असून भंडारा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारार्थ पवनी येथे दुपारी 3.30 वाजता जाहिर सभा घेणार असल्याची माहिती महायुतीतील घटक पक्षांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूकीच्या प्रचाराला गती येऊ लागली असून आता मोठ्या नेत्यांच्या जाहिर सभांना सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी आज आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, भाजपाचे जिल्हा महामंत्री मयुर बिसेन, समन्वयक नितीन कडक, महेंद्र निंबार्ते, नितीन कारेमोरे, विकास मदनकर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री तिनदा जिल्हयात आले होते. तिनही वेळा ते भंडारा शहरात आले. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री महोदयांची प्रचार सभा पवनी येथे घेण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांनी सांगितले. सभा पवनीच्या संभाजी चूटे रंगमंदिराच्या प्रांगणात दूपारी ३.30  वाजता होणार आहे. सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. प्रफुुल्ल पटेल राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने केलेल्या विकासाच्या जोरावर आम्ही या निवडणूकीत पूढे आहोत, असेही यावेळी सांगण्यात आले.
महायुती म्हणून सर्व घटक पक्ष आम्ही सोबत आहेत. सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या विजयासाठी श्रम घेत आहेत. जे पक्ष विरोधी कारवाई करताना आढळतील, अशांवर वरिष्ठांकडून कारवाई केली जाईल, असे संकेत यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपाचे जिल्हा महामंत्री मयुर बिसेन व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी सांगितले. या सभेला विकासाची वाट चालू ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिक बंधू भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

COMMENTS