गौतम नगरि चौफेर संजीव भांबोरे भंडारा – महापुरुष निर्जीव समाजात चेतना निर्माण करतात. समाजाला प्रेरणा देतात. खचलेल्या समाजाला शक्ती देवून उभे करतात. ते झोपलेल्या समाजाला हलवितात, चालवितात आणि चेतवितात. त्याला संघर्षासाठी प्रेरित करतात. संघर्ष करीत करीत संघटित करतात. महापुरुष चिंतनमग्न असतात. चिंतनातून त्यांना परिस्थितीचे अवलोकन व आकलन होत जाते. त्यांना काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभत असते. त्यापैकी कांशीराम नावाचं संघर्षशील व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहतो. कांशीराम यांचा जन्म दिनांक १५ मार्च १९३४ साली पंजाब मधील रोपड जिल्ह्यातील खवासपूर येथे रामदासीया कुटुंबात झाला. रामदासीया समाज सुरू रविदासांना मानणारा समाज आहे. कांशीराम पुण्याच्या डिफेन्स सायंटिफिक रिसर्च सेंटर या ठिकाणी ऑफिसर या पदावर कार्यरत होते. तिथल्या एका मॅनेजरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध जयंती ची सुट्टी रद्द केली व त्या ऐवजी दुसरी सुट्टी जाहीर केली. त्या विरोधात चतुर्थश्रेणी कर्मचारी दिनाभाना नावाच्या व्यक्तीने आवाज उठविला. त्याची शिक्षा म्हणून तिथल्या मॅनेजरने त्याला नौकरीतून बडतर्फ केले. एक चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी सफाई कामगार आपल्या महापुरुषांच्या जयंतीच्या सुट्टीसाठी आवाज उठवितो आणि मगरुर अधिकारी त्यालाच नौकरीतून काढून टाकतो. हे बघून कांशीराम यांच्या संवेदनशील (अंतकरणाला हा अन्याय सहन नाही झाला व त्यांनी दिनाभाना यांना साथ देवून त्यांची केस दिल्लीपर्यंत व संरक्षण मंत्र्यांपर्यंत नेली व दिनाभानाला न्याय मिळवून दिला. त्या घटनेचा कांशीराम यांच्या मनावर एवढा परिणाम झाला. त्यांनी अन्यायी व्यवस्था समुळ नष्ट करण्यासाठी संपूर्ण जीवनाचं बलिदान देण्याची प्रतिज्ञा केली व त्यानंतर पुन्हा कधी कार्यालयात गेले नाहीत. जातिभेदाविरुद्ध गुरु रविदासांनी संघर्ष केला होता.
तोच विषय घेवून कांशीरामजी च्या मनात जातीव्यवस्थेचा विरोध करण्याची शक्ती निर्माण झाली. कांशीराम यांच्या आईवडिलांनी त्यांचा विवाह करण्याचे ठरवले होते. तेव्हा त्यांनी आपल्या आईला २४ पानाचे पत्र लिहून त्यांना सांगितले होते.
” माँ मुझे सेहरा नही चाहीए मै कफन बांधकर जीना चाहता हु” त्यामध्ये त्यांनी आपले जिवनाचे लक्ष रेखांकित केले होते व प्रतिज्ञा केली की , मी विवाह करणार नाही. घर आणि कुटुंब निर्माण करणार नाही, लग्न असो किंवा मृत्यू कुटुंबातील कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही. व्यक्तिगत रूपाने माझी कोणतीही संपत्ती राहणार नाही. बहुजन समाजच माझे कुटुंब आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी दिवस रात्र झटणे हेच माझे ध्येय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अभ्यास अवलोकन करू लागले. सहकारी जोडत राहिले. त्यांनी १९७८ ला बामसेफ नावाची संघटना निर्माण करून देशातील बुद्धिजीवी कर्मचाऱ्यांना एकत्रित केले. १९८१ ला डी.एस.फोर व बुद्धिस्ट रिसर्च सेंटर स्थापन केले व १४ एप्रिल १९८४ ला बीएसपी पक्षाची स्थापना करून बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाने प्रेरीत होवून कांशिराम यांनी संत रविदास, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकाराम, गाडगेबाबा, पेरियार रामस्वामी नायकर, बिरसामुंडा इत्यादी परिवर्तनवादी महापुरुषांचा अपूर्ण राहिलेला संघर्ष पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जीवन बहुजन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला देशभर पोहोचवून गतिमान केले. कांशी तेरी नेक कमाई तुमने सोती कौम जगाई हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.
मैने एक शमा जलाई, हवाओके के खिलाप कुण्या कवीच्या ओळी कांशिरामच्या जीवनकार्याला यथातथ्य लागु पडतात. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाने प्रेरित होवून जीवनभर तुटलेला समाज, मोडलेला समाज उभे करण्यासाठी मिळेल त्या साधनाने कधी सायकलने, कधी बसने, रेल्वेने भारतभर भ्रमण करत राहिले. त्यांचा एवढा सायकलने प्रचार, प्रसार करणारा राष्ट्रीय नेता शोधूनही सापडणार नाही. फुले, आंबेडकरी विचार घराघरात पोहोचविण्यासाठी ही समतावादी, मानवतावादी विचारधारा या देशाची प्रबळ विचारधारा व्हावी यासाठी त्यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घातला. त्यासाठी नोकरी सोडली. कौटुंबिक सौरत्वाचा त्याग केला. निळे आकाश हेच छत व धरती हेच घर बनविले व या देशातील बहुजन समाजाला शासनकर्ते बनविण्याकरिता जातीजातीमध्ये विखुरलेल्या समाजाला एकसंघ करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून, बहुजन समाजाच्या संविधानिक अधिकाराकरिता अनेक आंदोलने केले. त्यांनी बहुजन नायक, बहुजन संघटक इत्यादी नियतकालिके काढून बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडून मानवतावादी महापुरुषांचा खरा इतिहास बहुजन समाजापुढे आणला. बहुजन चळवळीचे प्रवर्तक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारप्रणालीचे खंदे प्रचारक पंच्यांशी टक्के बहुजन समाजाला संघटित आणि प्रबोधित करणारे महापुरुष म्हणून कोट्यावधी जनतेच्या घराघरात कांशिराम पोहोचले असून खऱ्या अर्थाने ते बहुजन हृदय सम्राट बहुजन नायक ठरले आहेत. फुले, शाहू, भीमा नंतर बहुजनांचा वाली घरोघरी पेटविल्या क्रांतीच्या मशाली या कामाचे कुणा काही मागितले ना दाम वारे वा धन्य कांशिराम. अश्या या संघर्षशील व्यक्तिमत्वाने ९ ऑक्टोंबर २००६ ला जगाचा निरोप घेतला. कांशिरामजींच्या परिवर्तनवादी विचारांना, अनमोल कार्यांना व धाडसी प्रवासाला त्यांच्या जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन..
लेखक
समाजमित्र नाशिकभाऊ चवरे
रा.पिपरी पुनर्वसन त. जि. भंडारा


COMMENTS