राजुरा परीक्षा केंद्रातील गैरव्यवस्थेवर विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी; चौकशीची मागणी.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा परीक्षा केंद्रातील गैरव्यवस्थेवर विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी; चौकशीची मागणी.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,२८ एप्रिल गोंडवाना विद्यापीठांतर्गत परीक्षा केंद्र क्रमांक ३२३, शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथे सुरू असलेल्या उन्हाळी २०२६ परीक्षेदरम्यान गंभीर गैरसोयी व गैरप्रकार घडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, चिंचोली (खुर्द) येथील विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत. दि. २८ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात बी.एस्सी. सेमिस्टर ६ चा पेपर सुरू असताना परीक्षा कक्षात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवला. तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वर्गातील पंखे बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांना उकाड्याचा तीव्र त्रास सहन करावा लागला. तसेच पिण्याच्या पाण्याची कोणतीही समर्पक व्यवस्था नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. याचबरोबर, काही कक्षांमध्ये कॉपीप्रकरणे सुरू असल्याच्या चर्चा असून, काही विद्यार्थ्यांनी स्वतः अशा हालचाली पाहिल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण घटना केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नोंद झालेली आहे. त्यामुळे संबंधित फुटेजची पाहणी करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुढील परीक्षांसाठी केंद्रावर सुरक्षित, सुव्यवस्थित व सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या संदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा संचालक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना लेखी निवेदन सादर केले असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page