– वनपरिक्षेत्र अधिकारी दिगंबर बल्की यांच्या उपस्थितीत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी दिला सहभाग.
गौतम नगरी चौफेर बांदल बेले राजुरा, दि.१८ नोव्हेंबर
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुरा येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचे ‘वसुंधरा मित्र’ कार्यक्रमांतर्गत बेसलाइन मूल्यांकन उत्साहात संपन्न झाले. यावेळी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, राजुरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिगंबर बल्की तसेच वसुंधरा मित्र मास्टर ट्रेनर बादल बेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
वसुंधरा मित्र कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, निसर्ग संवर्धनाची आवड जोपासणे आणि पर्यावरणपूरक सवयी विकसित करणे हा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. या अनुषंगाने इयत्ता सातवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी बेसलाइन मूल्यांकन घेण्यात येत आहे. प्रश्नावलीच्या माध्यमातून कार्यक्रमातील उपक्रम सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे पर्यावरणविषयक ज्ञान, दृष्टिकोन, दैनंदिन सवयी आणि प्रत्यक्ष कृती यांची सद्यस्थिती जाणून घेतली जात आहे. या मूल्यांकनादरम्यान विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वतःच्या ज्ञानानुसार, विचारांनुसार आणि प्रत्यक्ष जीवनातील सवयींनुसार प्रश्नांची उत्तरे दिली. प्रत्येक मास्टर ट्रेनरने आपल्या शाळेसोबतच आपल्या कार्यक्षेत्रातील एक ग्रामीण व एक शहरी शाळेचेही मूल्यांकन करणे अपेक्षित आहे.

कार्यक्रमातील उपक्रम सुरू होण्यापूर्वी बेसलाइन प्रश्नावली विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात येत असून, मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रश्नावली कुरिअरद्वारे WWF-India, Maharashtra State Office, Mumbai येथे पाठविण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना मास्टर ट्रेनर बादल बेले यांनी स्पष्ट केले की, “हे मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा नसून, वसुंधरा मित्र कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पर्यावरणविषयक ज्ञानात, दृष्टिकोनात, सवयींमध्ये आणि प्रत्यक्ष कृतींमध्ये किती सकारात्मक बदल व प्रगती घडून येते, हे समजून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. बेसलाइन मूल्यांकन आणि कार्यक्रमानंतरचे मूल्यांकन यांच्या तुलनेतून विद्यार्थ्यांमधील बदल निश्चितपणे समजण्यास मदत होईल.”
पर्यावरण संवर्धनाची जाणीव बालवयातच रुजवून जबाबदार आणि निसर्गप्रेमी भावी पिढी घडविण्याच्या दृष्टीने ‘वसुंधरा मित्र’ कार्यक्रमातील हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

