गौतम नगरी चौफेर (“अरे, टेन्शन घेतो कशाला?” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, कुणाला समजावताना आपणही म्हणतो. पण खरंच विचार केला तर — आपण हे वाक्य जितकं बोलतो तितकं आपण जगतो का?
आजचा काळ वेगवान आहे. स्पर्धा, अपेक्षा, जबाबदाऱ्या, सामाजिक दबाव, आर्थिक तणाव या सर्व गोष्टी माणसाला मानसिकरित्या थकवून टाकतात. पण प्रश्न असा आहे की — तणाव न घेता जीवन जगता येईल का?
स्वतःची मर्यादा ओळखा:-
सर्व काही आपल्या हातात नसतं हे मान्य केल्याने अर्धा तणाव कमी होतो. आपण आपल्या कुवतीनुसार काम केलं तर अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील दरी कमी होईल.
नाही’ म्हणायलाही शिका:-
सर्वांनाच ‘हो’ म्हणणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. प्रसंगी ‘नाही’ म्हणणं गरजेचं असतं, विशेषतः जेव्हा तुमच्या मन:शांतीवर परिणाम होतोय.
वर्तमानात जगा:-
भूतकाळाच्या पश्चात्तापात आणि भविष्याच्या भीतीत अडकलेलं मन कधीच शांत राहत नाही. ‘आत्ता’ या क्षणात जगण्याचा प्रयत्न करा. तोच क्षण खरा असतो.
मनापासून हसत रहा:-
हसणं म्हणजे एक नैसर्गिक औषध आहे. विनोद, गप्पा, मित्रांच्या सहवासात काही क्षण निखळ हसल्यास मन हलकं होतं. तणाव विरघळतो.
स्वत:साठी थोडा वेळ राखून ठेवा:-
दिवसभर इतरांसाठी धावताना स्वतःला हरवून बसू नका. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी — वाचन, ध्यान, फिरणं किंवा आवडतं एखादं छंद यासाठी वापरा.
स्वस्थतेचा श्वास घ्या:-
योग, प्राणायाम, ध्यान ही केवळ प्राचीन परंपरा नाहीत, तर आजच्या जीवनशैलीसाठी जीवनदायी साधने आहेत. दिवसाची सुरुवात शांतपणे केली तर दिवसभराच्या तणावाला सामोरं जाता येतं.
कृतज्ञतेची सवय लावा:-
आपल्याकडे जे आहे त्यासाठी मनापासून ‘धन्यवाद’ म्हणा. सतत असलेल्या कमतरता माणसाला अस्वस्थ करतात, तर कृतज्ञता त्याला समाधानी बनवते.
तणाव हा अपरिहार्य आहे, पण तणावात जगणं हे आपलं स्वतःचं निवड असतं. छोट्या गोष्टींत आनंद शोधायला शिका. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो — टेन्शन घेऊन तो वाया घालवू नका.
आज जग इतक्या वेगात धावतंय की थांबायला वेळच उरलेला नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस काहीतरी मिळवण्यासाठी धावतोय — पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी, नात्यांमधल्या अपेक्षांसाठी… आणि या धावपळीत तो हरवत चालला आहे — स्वतःला. आणि मग, नकळत त्याचं आयुष्य तणावाचं बनून जातं.
अशा वेळी एक साधं पण खोल अर्थ असलेलं वाक्य कानावर पडतं —
“अरे, टेन्शन घेतो कशाला?”
पण ते खरंच केवळ वाक्य राहतं की आपण त्यामागचा अर्थ आत्मसात करतो?
तणाव म्हणजे काय?
तणाव (Stress) म्हणजे एखाद्या परिस्थितीत आपण असहाय्य, असुरक्षित किंवा अकार्यक्षम असल्याची भावना. तो मानसिक असतो, पण शरीरावरही त्याचे परिणाम दिसतात — डोकेदुखी, निद्रानाश, चिडचिड, पचनतंत्र बिघडणे, रक्तदाब वाढणे इत्यादी.
पण लक्षात ठेवा:
संकट हे बाहेरचं असतं, तणाव हा आतला असतो.
तणावाचे प्रकार:
व्यक्तिगत तणाव – आरोग्य, नाती, आत्मविश्वास.
व्यावसायिक तणाव – कामाचा ताण, स्पर्धा, आर्थिक अस्थिरता.
सामाजिक तणाव – समाजाच्या अपेक्षा, प्रतिष्ठा, तुलना.
तांत्रिक तणाव – सतत मोबाईल, मेल्स, सूचना यामुळे विस्कळीत होणं.
तणाव न घेता उत्तर देण्याचे मार्ग:
प्राधान्य ओळखा — सर्व काही एकाच वेळी शक्य नाही.
“आज सगळं करून टाकलं पाहिजे!” — ही भावना तणावाची जननी आहे. याऐवजी, ‘काय गरजेचं आहे, आणि काय थांबवता येईल?’ हा विचार उपयोगी पडतो.
तुलना नको — प्रत्येकाची वेळ वेगळी असते
“त्याच्याकडे गाडी आहे, तिने घर घेतलं, मी मागे पडलो” — ही तुलना तणाव वाढवते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. स्वतःच्या गतीने वाटचाल करा.
अपयश स्वीकारा — तेच शिकवतं:-
एखादं काम फसल्यावर स्वतःला दोष देणं सोडा. अपयश हे यशाच्या दिशेने जाण्याचं पाऊल असतं. “मी शिकलो का?” हा प्रश्न विचारणं अधिक उपयुक्त.
संवाद ठेवा — बोलणं तणाव हलका करतं:-
कधी-कधी मनातलं बोलणं कोणाला सांगणं तणाव दूर करतं. मित्र, कुटुंब, समुपदेशक हे तुमचं ‘सेफ स्पेस’ असू शकतात.
तणावमुक्त जीवनासाठी दैनंदिन सवयी:-
ध्यान आणि प्राणायाम:
दररोज १०–१५ मिनिटं शांतपणे बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन हलकं होतं, विचार स्थिर होतात.
तंत्रज्ञानापासून थोडं दूर रहा:
‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणजेच काही वेळ फोन, टीव्हीपासून दूर राहणं. निसर्गात फिरणं, वाचन करणं, स्वतःशी संवाद साधणं — या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी अमूल्य ठरतात.
• पुरेशी झोप आणि व्यायाम:
तणावग्रस्त मनाला झोपेची आणि शरीराला हालचालीची गरज असते. नियमित चालणं, हलकं व्यायाम, झोपेचं शिस्तबद्ध वेळापत्रक ठेवा.
हसण्याची सवय लावा:
निखळ हसणं म्हणजे नैसर्गिक औषध! विनोद, लहान मुलांबरोबर वेळ, सर्जनशील छंद हे आनंद देतात.
वास्तव स्वीकारा, पूर्णता नाही:-
कोणतेही जीवन ‘परिपूर्ण’ नसतं. चित्रपट, सोशल मीडियावर दिसणारी ‘आदर्श’ दृश्यं ही क्षणिक आणि अर्धवट असतात. खऱ्या आयुष्यात त्रास, संघर्ष, विसंवाद हेही असतात — पण तेच आपल्याला परिपक्व करतात.
कृतज्ञता आणि समाधान:-
रोज रात्री झोपण्याआधी ३ गोष्टी लिहा — ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात.
हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे जे आहे ते खूप आहे.
‘टेन्शन’चं रूपांतर ‘दिशा’त करा:-
प्रत्येक ताणतणाव मागे एक अस्वस्थता असते. ती समजून घेतली, तर तीच एक प्रेरणा ठरू शकते.“जिथे भीती आहे, तिथे संधी आहे.”
— ही दृष्टी ठेवली, तर जीवन सुसह्यच नव्हे तर सुंदर वाटेल.
अपेक्षा:- “टेन्शन घेऊन प्रश्न सुटत नाहीत,पण शांत मनाने मार्ग नक्की सापडतो!”
म्हणूनच…
“हसत रहा, घडत रहा…अरे, टेन्शन घेतो कशाला?”
— राहुल डोंगरे —
” पारस निवास ” शिवाजी नगर तुमसर.जि. भंडारा म.रा.
मो.न.9423413826


COMMENTS