आठ चमु तपासाकरीता देशभरात होणार “सर्च मोहीम”
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – साकोली शहरातील श्याम हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी तपासणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अश्लील चाळे करणाऱ्या साकोली येथील श्याम हॉस्पिटलचा संचालक डॉ. देवेश अग्रवाल यांच्या शोधासाठी भंडारा जिल्हा पोलिसांनी आता “ऑपरेशन लुक आउट” सर्क्युलर जारी केले. यासोबतच त्याच्या शोधासाठी ८ पथके तयार केली असून ती रवाना झाली आहेत. आज दोन आठवड्यापासून आरोपी डॉ. देवेश अग्रवाल हा अद्याप फरारच आहे.
०९ जुलैला एक अल्पवयीन १७ वर्षीय मुलगी आपल्या आईसोबत डॉ. देवेश अग्रवाल यांच्या श्याम हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी तपासणीसाठी गेली होती. यादरम्यान तिच्या आईला बाहेर ठेवून सुमारे अर्धा तास त्याने तिच्याशी अश्लील वर्तवणूक केली होती. या प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर डॉ. देवेश अग्रवाल याच्याविरुद्ध साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, तेव्हापासून तो फरार आहे. दरम्यानच्या काळात त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो नाकारला. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. देवेश अग्रवाल याच्या तपासासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत झाली आहे. “ऑपरेशन लुक आउट” सर्क्युलर जारी करण्यात आले असून देशभरातील सर्व पोलिस ठाण्यांना या संदर्भात आता पत्र रवाना झाले आहे. यासोबतच सर्व पोलिस स्टेशनमध्ये वायरलेस वरून सूचना देण्यात आल्या आहेत. या डॉक्टरच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण व साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस दल यापूर्वी महाराष्ट्रासह मुंबई, मध्यप्रदेश, गुजरात येथे जाऊन आले होते, मात्र त्याचा कुठेच शोध लागला नाही. त्यामुळे “ऑपरेशन लुक आउट सर्क्युलर” जारी करण्याचा मार्ग पोलिसांना स्वीकारावा लागला.
पोलीसांनी डॉ. देवेश अग्रवाल यांचे नावे असलेले आणि श्याम हॉस्पिटलच्या नावे असलेले बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले आहे. पोलिसांनी त्या संदर्भात संबंधित बँकांना पत्र दिल्यानंतर ही कारवाई झाली. यासोबतच त्याच्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच डॉ. देवेश अग्रवाल हा विदेशात जाऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासोबतच ज्या नातेवाइकांनी त्याला आश्रय दिला किंवा पळून जाण्यास मदत केली, त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलमान्वये कारवाई करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी दिली.


COMMENTS